आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Raided Gambling Centre At Aurangabad, 80 People Arrested

औरंगाबादेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, ८० प्रतिष्ठित जणांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : चिकलठाण्यात एका शेडमध्ये सुरू असलेला जुगार अड्डा.
औरंगाबाद- चिकलठाण्यातील पत्र्याच्या शेडमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री धाड मारून पोलिसांनी ८० प्रतिष्ठित जुगा-यांना अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख १९८ रुपयांची रोख रक्कम, ४७ दुचाकी, १० कार आणि मोबाइल असा ६१ लाख ९५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. हा अड्डा चंदू पहाडिया व अण्णा मगरे हे दोघे चालवत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे हे दोघेही शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते.

पोलिसांनी जुगार अड्ड्यांविरुद्ध मोहीम उघडली आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी शिवाजी कॉलनीत धाड घालून १८ जुगारी व पावणेतीन लाख रुपये ताब्यात घेतले. परमेश्वर डांगे हा अड्डा चालवत होता. शनिवारी पोलिसांना चिकलठाण्यात जयहिंद पब्लिक स्कूलजवळ साई मंदिरासमोर भाड्याच्या शेडमध्ये अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव व सहायक निरीक्षक प्रियंका थोरात यांच्या पथकाने रात्री ८.३० वाजता छापा टाकला. पोलिसांनी घेराव घातल्याने एकाही जुगा-याला पळून जाण्याची संधी मिळाली नाही.

जमेल तेथे लपवले पैसे
पोलिसांनी धाड टाकल्याचे कळताच जुगा-यांमध्ये खळबळ उडाली. मुख्य प्रवेशद्वारच पोलिसांनी अडवल्याने बाहेर पडण्याचा मार्ग बंद होता. त्यामुळे जुगा-यांनी त्यांच्याकडील पैसे मिळेल त्या ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न केला. काहींनी बाथरूममधील बादलीत, तर काहींनी अडगळीत पैसे लपवले. पोलिसांनी सर्व जागांचा शोध घेऊन ११ लाख १९८ रुपये जप्त केले आहेत.
शेडमध्ये कोंडूनच झाडाझडती : ताब्यात घेतलेल्या सर्व ८० जुगा-यांना रात्री उशिरा पंचनामा होईपर्यंत शेडमध्येच कोंडले होते. प्रत्येकाचे नाव, पत्ता विचारला जात होता. अटकेतील लोक शहरातीलच रहिवासी असून बहुतेक जण प्रतिष्ठित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आरोपींत प्लॉटिंगवाले, शाखाप्रमुख : अटक केलेल्या प्रतिष्ठितांत एका पक्षाचा शाखाप्रमुख, प्लॉटिंग व्यावसायिकांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. बदनामी होऊ नये म्हणून अनेक जण पोलिसांना बनावट नावे सांगून अंग काढून घेण्याचा प्रयत्न करत होते.
जप्त मुद्देमाल : जुगा-यांकडून ११ लाख १९८ रुपये रोख. शिवाय ५० लाख रुपये किमतीची ४७ दुचाकी आणि चारचाकी वाहने व ९५ हजार रुपये किमतीचे मोबाइल जप्त केले आहेत.