आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परप्रांतीय बनणार शहरात पोलिस शिपाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी जारी केलेल्या पोलिस भरतीसंदर्भातील आदेशात अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्राची अट रद्द केल्याने परप्रांतीय तरुणांना औरंगाबाद शहरात पोलिस शिपाई बनण्याची मुभा दिली गेली आहे. या निर्णयामुळे स्थानिक तरुणांच्या नोकर्‍यांवर गदा आली आहे.

पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी संबंधित आदेश विशेष अधिकारात काढले असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध दर्शवला आहे. निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सोमवारपासून (13 मे) पोलिस आयुक्तालय हद्दीत सध्या 68 पोलिस शिपाई पदांसाठी भरती सुरू झाली. शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षा मराठीतच होणार असल्याने मराठी तरुणांचीच भरती होईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना वाटते. परंतु प्रत्यक्षात शारीरिक चाचणीत पैकीच्या पैकी गुण मिळवून लेखी परीक्षेत पात्र ठरल्यानंतर परप्रांतीय उमेदवारही सहज भरती होण्याची शक्यता असल्याने स्थानिक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत.

भरतीसाठी संपूर्ण मराठवाड्यातून 640 महिला उमेदवार आणि 3 हजार 160 पुरुष उमेदवार असे एकूण तीन हजार 800 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. 2012 मध्ये 352 जागांसाठी भरती घेण्यात आली होती. त्या वेळी अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्रावरून बराच गोंधळ उडाला होता. जुन्या तारखेचे प्रमाणपत्र असल्याने उमेदवारांना वगळण्यात आले होते. त्यामुळे यंदा पोलिस महासंचालकांनी अधिवास प्रमाणपत्राशिवाय भरती घेण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर 18 मेपर्यंत सकाळी सहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत मैदानी चाचणी घेतली जात आहे. त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. गोळाफेक, शंभर मीटर धावणे, लांब उडी आणि पुल अप्स अशा चाचण्या सोमवारी घेण्यात आल्या. मंगळवारी (14 मे) सकाळी साडेपाच वाजेपासून राज्य राखीव पोलिस बलापासून पाच किलोमीटरपर्यंत धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे.

मराठी मुलांनाच प्राधान्य हवे
जन्माने मराठी असणार्‍या तरुणांनाच राज्यात नोकरीचा अधिकार आहे. जो मराठी भूमिपुत्र आहे त्यालाच नोकरी मिळायला हवी. डोमिसाइलची अट कायम ठेवायला हवी. मराठी मुलांनाच प्राधान्य द्यायला हवे. मात्र, ही अट रद्द केली असेल तर त्याला आमचा विरोध आहे. याविरुद्ध आंदोलन पुकारले जाईल.
गजानन काळे, संपर्क अध्यक्ष, शहर मनसे.

दोन्ही चाचण्यांच्या आधारावर निवड
पोलिस शिपाई भरती प्रक्रियेत 100 गुणांची शारीरिक चाचणी आणि 100 गुणांची लेखी परीक्षा असे दोन टप्पे ठरवण्यात आले आहेत. शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवणार्‍या उमेदवारांना 1 :15 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर बहुपर्यायी स्वरूपाची लेखी चाचणी घेण्यात येईल. लेखी आणि शारीरिक चाचणीच्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.