औरंगाबाद- पोलिस आयुक्तालयाने शिपायांच्या 381 जागांसाठी रविवारी (6 जुलै) घेतलेल्या लेखी परीक्षेत 3 हजार 787 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. 2 पोलिस उपायुक्त, 4 एसीपी, 10 पोलिस निरीक्षक, 41 फौजदार अन् 205 हेड कॉन्स्टेबलरूपी परीक्षकांच्या कडक निगराणीत लेखी परीक्षा झाली. खुद्द पोलिस आयुक्तच्या देखरेखीत ही परीक्षा झाली. साडेतीन हजार तरुण-तरुणी, त्यांच्यासोबतचे हजारो नातेवाईक, आणि बंदोबस्तावरील शेकडो पोलिसांच्या उपस्थितीमुळे गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल आणि गारखेडा-उस्मानपुरा रस्त्याला जणू यात्रेचे स्वरुप आले होते. या परीक्षेला 316 उमेदवार गैरहजर होते.
या परीक्षेचा सोमवारी (7 जुलै) दुपारी निकाल घोषित केला जाणार आहे. राज्यातील 13 हजार 453 पैकी 381 पोलिस शिपाई पदासाठी शहर पोलिस मुख्यालयाने जूनमध्ये शारीरिक चाचणी घेतली. सर्व प्रकारच्या अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर 4103 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले.
तगडा पोलिस बंदोबस्त
परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त गणेश राठोड, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अविनाश आघाव, बाबाराव मुसळे, मुकुंदवाडीचे पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, इंदरसिंह बहुरे, धनंजय येरुळे आदींसह 130 जमादार (परीक्षक), 26 फौजदारांनी विभागीय क्रीडा संकुलात काम पाहिले, तर र्शीहरी पॅव्हेलियनमध्ये भरती प्रक्रिया प्रमुख तथा उपायुक्त डॉ. जय जाधव यांच्यासह एसीपी के. एस. बहुरे, पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांच्यासह 75 जमादार (परीक्षक) आणि 26 फौजदारांचा लवाजमा तैनात होता.
आज निकाल देऊ
अत्यंत पारदर्शकपणे जूनमध्ये शारीरिक चाचणी, तर रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. नियमानुसार 24 तासांत निकाल देणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत आम्ही गुणाक्रमानुसार यादी लावणार आहोत. डॉ. जय जाधव, पोलिस उपायुक्त तथा भरतीप्रक्रिया प्रमुख
विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावरच अशी गर्दी उसळल्याने सूतगिरणी चौकातून शहानूरमियां दर्गा आणि उस्मानपुर्याकडे जाणार्या रस्त्यावर तोबा गर्दी झाली होती.