आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराच्या खिशात ‘आरटीओ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - परभणीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍याचा बनावट शिक्का तयार करून पोलिस भरतीसाठी आलेल्या कन्नड तालुक्यातील उमेदवाराला सोमवारी (13 मे) सकाळी पोलिसांनी पकडले. त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर विठ्ठल वाघ (19, रा. मेहगाव) असे त्याचे नाव आहे.

पोलिस आयुक्त कार्यालयातील देवगिरी मैदानावर शिपायांच्या 68 पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीला सोमवारी सकाळी सहा वाजेपासून प्रारंभ झाला. भरतीसाठी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे तपासत असताना पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, पोलिस नाईक एस. डी. पवार, भरत धवन, जी. बी. पाईकराव, जी. एस. कागदे, दीपक सोनवणे उमेदवारांची झडती घेताना त्यांना किशोर वाघ याच्या खिशात परभणी उपप्रादेशिक अधिकार्‍याच्या नावे असलेला बनावट रबरी शिक्का आढळला. स्टॅम्प पॅड आणि शिक्क्यासह त्याला पकडले. त्याची शैक्षणिक कागदपत्रे तपासली असता बारावी पासच्या प्रमाणपत्रावर त्याने हा शिक्का साक्षांकित केल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला भरती प्रक्रियेतून बाहेर काढून त्याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याने हा शिक्का कोणाकडून बनवला याचा तपास पोलिस करत आहेत.