आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी जुळवली ३७ जोडप्यांची मने, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतली दखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या वादाची दखल पोलिसांनी घेतली आणि ३७ जोडप्यांचा उद्ध्वस्त होणारा संसार समुपदेशनाच्या माध्यमातून पूर्वपदावर आणण्याची फार मोठी कामगिरी पोलिस प्रशासनाने केली. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
छोट्या-छोट्या गोष्टीवरून पती-पत्नीमध्ये उडणारे खटके आणि एकमेकांपासून काडीमोड घेण्याच्या मन:स्थितीतून पोलिसांकडे घेतलेली धाव, असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे सामाजिक जाणीव जोपासणारे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी एकमेकांबद्दल मने दुभंगलेल्या जोडीदारांना विभक्त होण्यापासून रोखले. पोलिस आयुक्तालयातील महिला कक्षात बुधवारी वाद निर्माण झालेल्या ९७ पैकी ६१ जोडप्यांचे समुपदेशन केले. त्यापैकी ३७ जोडप्यांची मने जुळवण्यात यश मिळवले. १६ प्रकरणे चौकशीसाठी ठेवण्यात आली. प्रकरणांत समन्स देण्यात आले. या वेळी महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यकर्त्यांचे योगदान
प्रा. मंगला खिंवसरा, स्नेहलता मानकर, मनोरमा शर्मा, सुलभा खंदारे, सय्यदा शाहजान, विमल मापारी, सुरय्या बेगम, आरती ढोके, शुभांगी गव्हाणे, ज्योती दाशरथी, सईदा शहा, नसिमा खालेद, सफिया लक्ष्मीनारायण यांनी काम बघितले.

समुपदेशनासाठी आठ टेबल लावले होते. त्यावर कार्यकर्त्या आणि महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी जोडप्यांना एकत्र राहण्यासाठी मार्गदर्शन करत जोडप्यांचे म्हणणे ऐकत होते. आयुष्यात होणाऱ्या त्रासाबाबत ते समजावून सांगत होते.
शहरातील मातोश्रीनगर येथील कविता मधुकर वाडेकर (२८) आणि अहमदनगरचे गिरीश अरविंद गलांडे ( ३२) यांचा ३० एप्रिल २००८ रोजी विवाह झाला. दोघांच्याही घरची परिस्थिती जेमतेम आहे. कविताचे वडील टेलरिंगचे काम करतात, तर अरविंदच्या वडिलांचे निधन झालेले आहे. लग्न जुळताना अरविंद कंपनीत काम करतो, असे मुलीकडच्या लोकांना सांगण्यात आले होते. परंतु तो काहीच कमाई करत नसल्याचे उघड झाले. माहेरहून पैसे आणण्यासाठी तो कविताकडे तगादा लावत होता. तिने पाच वर्षे पतीसोबत काढली. त्यानंतर कविता माहेरी गेली. पण बुधवारी त्यांच्या आयुष्यात नवी पहाट उजाडली आणि दोघांनी पुन्हा एकमेकांना स्वीकारले.
साट्यालोट्याच्या वादावर पडदा
सुनीतासुखलादे (रा. कांचनवाडी), बंडू सुखदेव सोनवणे (रा. जोडमालेगाव) आणि दादाराव सुखलादे (रा. कांचनवाडी) आणि मीना सोनवणे हे नात्यातले. बंडूला दादारावची बहीण दिली, तर बंडूची बहीण मीनाचा विवाह दादारावशी लावला. यांचे लग्न मे २००५ रोजी झाले. दोन्ही कुटुंबांचे साटेलोटे असल्यामुळे साहजिकच दोन्ही दादले बायकांना त्रास देऊ लागले. बंडूला दोन मुली आणि एक मुलगा. मात्र सुनीताला त्रास दिल्यामुळे ती आईकडे राहायची. तिकडे दादारावची पत्नीही पतीला सोडून माहेरी राहत होती. बंडूला एक मुलगा असून त्याने एकदाही बाळाला बघितले नाही. समुपदेशनात या दोन जोडप्यांना विचारण्यात आले की, साट्यालोट्याच्या वादात महिलांचे आयुष्य बरबाद कशासाठी करता? एकत्र येऊन चांगला संसार करा, असा सल्ला देताच अकरा वर्षांनंतर ही जोडपी एकत्र आली.