आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज : बजाजनगरातील दोन महिलांचे मंगळसूत्र चोरीच्या आरोपाखाली अटकेत असणाऱ्या आरोपी गणेश रमेश नेमाने (२८, रा. जळगाव सपकाळ, ता. भोकरदन) याने बुधवारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, त्याने आत्महत्या केलीच नसल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केल्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे (राज्य गुन्हे अन्वेषण) देण्यात आला. या पथकाने ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजची हार्डडिस्क ताब्यात घेऊन प्रकरणाची कसून तपासणी केली. 
 
गणेश कोठडीत असताना नेमके काय झाले. त्याच्यासोबत इतर कोणी होते का? ही घटना घडत असताना पोलिस कर्मचारी नेमके काय करत होते, याची माहिती मिळवण्यासाठी हे फुटेज उपयुक्त ठरणार आहे. फुटेज पोलिस निरीक्षक कक्षामध्ये असल्याने संबंधित कक्षात विनापरवानगी आत येण्यास मज्जाव करण्याबाबतची सूचना कक्षाबाहेर लावण्यात आली आहे. तसेच पाहणी करून परत जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी कक्षाला सील केले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज असणाऱ्या डीव्हीआरची “हार्डडिस्क’ ताब्यात घेतली आहे. मात्र, फुटेजमध्ये नेमके काय आढळले हे सांगण्यास नकार दिला. 
 
गणेशने बुधवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये गळफास घेतला होता. बेशुद्धावस्थेत त्याला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले होते. गणेशच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाइकांनी घाटीसमोर मोठी गर्दी केली होती. 
 
इनकॅमेरा शवविच्छेदन : गणेशने १४ जून रोजी रात्री लॉकअपमध्ये असणाऱ्या चादरीने गळफास घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी गणेशच्या मोठ्या भावाला पोलिसांनी घाटीत बोलावून घेतले. १५ जून रोजी न्यायदंडाधिकारी एस. जी. पवार, नायब तहसीलदार शिंदे आदींच्या उपस्थितीमध्ये इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. या वेळी सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे, गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक उपस्थित होते. 
 
‘तो’आत्महत्या करू शकत नाही : गणेशने त्याच्या मूळ गावीसुद्धा चोरी केली होती. तेव्हा गावकऱ्यांनी त्याला पकडून चोप दिला होता. त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, तो गळफास घेऊन आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. त्याचे वडील वारल्यामुळे त्याचा त्याच्या मोठ्या भावाचा सांभाळ त्याचे सेवानिवृत्त ग्रामसेवक आजोबा करत होते. गावातील शेतामध्ये मजुरांकडून काम करून घेण्यासह इतर किरकोळ कामे करणाऱ्या गणेशच्या पश्चात वृद्ध आई, एक चिमुकली मुलगी असून गरोदर पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. सध्या शेतात काम नसल्यामुळे तो वाळूज महानगरात आला होता. येथे आल्यानंतर चोरी करत झटपट पैसा कमावण्याचा मार्ग स्वीकारला. चुकीच्या मार्गाने पुढे निघालेल्या गणेशचा अंत दुर्दैवी ठरला. 
 
मुलगी झाल्याची आनंदवार्ता, पण... 
मुलगी झाल्याची आनंदवार्ता सांगण्यासाठी सासऱ्याने जावयाला फोन केला. मात्र, तिकडून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी फोन उचलणाऱ्या पोलिसांकडून समजताच मृत याच्या कुटुंबावर शोककळा पसरली. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हे प्रकरण गुरुवारी सीआयडीकडे सोपवण्यात आले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...