आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपवर मेसेज फिरल्याने रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह, पोलिसांच्या डोळ्यातही तरळले अश्रू...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालविवाह रोखल्यानंतर त्या मुलीच्या नातेवाइकांची साध्या वेशातील पोलिसांनी समजूत घातली. - Divya Marathi
बालविवाह रोखल्यानंतर त्या मुलीच्या नातेवाइकांची साध्या वेशातील पोलिसांनी समजूत घातली.
औरंगाबाद- माझ्या घराजवळ एका अल्पवयीन मुलीच्या विवाहाचा घाट घातला जात आहे, अशी माहिती एका तरुणाने मुंबईतील पत्रकार मित्राला शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास कळवली. त्या पत्रकाराने ही माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना सांगितली. त्याची गंभीर दखल घेत त्यांनी तातडीने औरंगाबादेतील पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना कारवाईची सूचना केली. दरम्यान, पत्रकार मित्राला माहिती देणाऱ्या तरुणाने तातडीचा दुसरा उपाय शोधत या प्रकाराची माहिती व्हॉट्सअॅपवर टाकली. काही मिनिटांतच ती व्हायरल झाली. प्रकरण गंभीर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि बालविवाह टळला. 

जळगाव रोडवरील एका मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी दहाची वेळ. सर्वत्र लग्नाची घाई सुरू होती. लग्नाचा मंडपात कुटंबातील काही ज्येष्ठ सदस्य खुर्च्यांवर बसलेले होते. लहान मुले गाण्यांच्या तालावर बागडत होती. डोली बाजावाल्यांनी सूर धरले होते, पाहुणे मंडळी भेट वस्तू घेऊन लगबगीने मुहूर्त गाठण्याचा प्रयत्न करत होती. आचाऱ्याने गरम पुरीचे घाणे काढण्यास सुरुवात केली होती. काही मिनिटांतच नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी येईल अशी वधूकडील प्रमुख व्यक्ती प्रतीक्षा करत होती. काहीजण पाहुण्यांच्या स्वागतासाठी मंडपाच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत होते. दरम्यान वऱ्हाडाच्या गाडीऐवजी पोलिसांच्या व्हॅनने लग्नमंडपात प्रवेश केला आणि एका अल्पवयीन मुलीला विवाहबद्ध होण्यापासून रोखण्यात आले. 

पोलिसांनी मुलीच्या नातेवाइकांना कायदा काय सांगतो हे समजावून सांगितले. त्यानंतर लग्न थांबले पण पोलिसांच्या सामजस्य भूमिकेमुळे कोणावरही गुन्हा नोंद करण्यात आला नाही. शुक्रवारी सकाळीच शहरातील पत्रकारांच्या आणि पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शहरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची मेसेज फिरत होता. पोलिसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, उपनिरीक्षक सागर कोते, सहायक फौजदार सुभाष कानकाटे, वैद्य, भानुसे घटनास्थळी पोहोचले. चौकशीनंतर मुलीचे वय १७ वर्ष ९ महीने असल्याचे समोर आले. नेहमीप्रमाणे त्यांनी पोलिसी खाक्या दाखवता मुलीच्या पालकांना बोलावले आणि त्यांना कायद्याची जाणीव करून दिली. अाम्ही काय सांगतो ते ऐका नाहीतर विवाह कायद्यांतर्गत तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल हाेईल, असे स्पष्टपणे सांगितले.
 
पाेलिसांनी केलेल्या समुपदेशनानंतर नातेवाइकांनी विवाह थांबवण्याचा निर्णय घेतला. लग्न बळजबरीने होते आहे का, असे पोलिसांनी वधूला विचारले असता, तसा कुठलाही प्रकार नसल्याचे समोर आले. हा पंचनामा सुरू असतानाच नगरहून आलेली वऱ्हाडी मंडळी विवाहस्थळी पोहोचली. त्यांनाही पोलिसांनी समजावून सांगितले. वधु आणि वर पक्षांनी विचार विनिमय करुन चार महिन्यानंतरचा लग्नाचा मुहूर्त काढला. पण तयार झालेल्या जेवणाचा स्वाद पाहुणे मंडळींनी घेतला आणि नवरी सोबत न घेताच नवरदेव घरी परतला. या एकूणच प्रक्रियेत पोलिसांनी निभावलेल्या भूमिकेचे काही सुशिक्षित मंडळीने स्वागतही केले. 
 
विवाह थांबवण्यात पोलिसांना आले यश 
व्हाॅट्सअॅपद्वारे या घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली होती. वरिष्ठांच्या आदेशाने मी घटनेची चौकशी केली. हा प्रकार सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने मी तत्काळ तेथील अधिकाऱ्यांना कळवले त्यांनी जाऊन हा विवाह थांबवला; दरम्यान पोलिसांकडून कोणालाही त्रास झाला नाही.
- ज्ञानेश्वर साबळे, पोलिस निरीक्षक, हर्सूल ठाणे 

आई नाही, वडील आजारी म्हणून नातेवाइकांनी घेतला पुढाकार 
मुलीची आई चार वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेली आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. रोज काम केले तरच पोटाचा प्रश्न सुटतो अशी परिस्थिती आहे. वडील कायम आजारी असतात. त्यांना अर्धांगवायू झालेला आहे. काही दिवसांपूर्वीच घरात चुलत बहिणीचे लग्न झाले. त्या वेळी या मुलीलाही नात्यातील स्थळ आले होते. त्यांना कौटुंबिक परिस्थितीची कल्पना होती. म्हणून घरातील इतर नातेवाइकांनी पुढाकार घेत लग्न जुळवले. 

पोलिसांच्या डोळ्यातही तरळले अश्रू ... 
लग्न रद्द झाले याची कल्पना कोणालाच नव्हती, त्यामुळे पाहुणे मंडळी घाईघाईने येत होती. या सगळ्यांना काय उत्तर द्यावे हे वधूच्या काकांना कळत नव्हते. ही परिस्थिती पाहून पोलिसांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. साध्या वेशात सहायक फौजदार कानकाटे सर्व पाहुणे जाईपर्यंत एका कुटुंबाप्रमाणे सगळ्यांना जेवण्याचा आग्रह करत होते. चार महिन्यांनंतर कायद्यानुसार होणाऱ्या विवाह सोहळ्यात आम्हीही सहभागी होऊ, असे आश्वासन पोलिसांनी मुलीच्या कुटंुबीयांना दिले. 
बातम्या आणखी आहेत...