आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘जावयाला’ दाखवला इंगा; दादागिरी करणार्‍यांना 600 रु. ची पावती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणीही यावे, भाऊगिरी, दादागिरी, साहेबगिरी करावी, वाट्टेल तशा गाड्या उडवाव्यात आणि वाहतुकीचे वाट्टोळे करावे. व्हीआयपी वगैरे लिहिलेले असल्याने वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा संबंधच येत नाही. कारवाई केलीच तर पुन्हा माघार घ्यावी लागते. वाकवले की वाकवता येते हे कळल्याने गल्लीबोळीतले छुटभैये सरकारी जावई पोलिसांना ठेंगा दाखवत त्यांचा आत्मविश्वास तुडवतात. रविवारीही असेच घडले असते, पण....

अतिशय वर्दळीच्या जळगाव टी पॉइंटवर... सायंकाळी साडेसातची वेळ. एक स्कॉर्पिओ जीप (एमएच 45 एन 1515) सुसाट वेगाने रामगिरी चौकाच्या दिशेने गेली.. सिग्नलवर अनेक जण थांबलेले असताना हे ‘व्हीआयपी’ झोकात निघाले. ड्यूटीवर असलेले हेडकॉन्स्टेबल बी. एस. थोरात, कॉन्स्टेबल बी. एन. डमाळे, एस. एस. आडबे यांनी रस्त्याच्या मधोमध उभे राहून ही जीप अडवली.

सिनेस्टाइल दादागिरी
वाहतूक पोलिसांनी गाडी अडवताच गाडीतील काही लोक सिनेस्टाइलने खाली उतरले. आम्ही रोटरी क्लबचे सदस्य आहोत. आमची गाडी का थांबवली. तुझे नाव काय, तुझा बक्कल नंबर सांग, पोलिस कसे आहेत हे आम्हाला माहीत आहे. चल हट बाजूला. तुला माहिती नाही ही गाडी कुणाची आहे. ही गाडी एसीपी साहेबांच्या जावयाची आहे, असे म्हणत या पोलिसांवर दबाव आणायला लागले. पण पोलिस ‘नियम तोडला, दंड भरा’ म्हणत ठाम होते.

हे माझे जावई...
हे सुरू असतानाच गाडीतील लोकांपैकी एकाने फोनाफोनी सुरू केली. काही वेळानंतर सामाजसेवकांच्या सेवेसाठी मुकुंदवाडी पोलिस स्टेशनचे खांडेकर नावाचे (त्यांनीच सांगितलेले नाव) पोलिस उपनिरीक्षक आले. त्यांनी वाहतूक पोलिसांना या गाडीत माझे जावई आहेत, सोडून द्या. असे फर्मान सोडले. चमूने या पीएसआयला झालेली दादागिरी सांगितली. मात्र, त्यांनी वाहतूक पोलिसांना गाडी सोडण्यास भाग पाडले.

एसीपींची अ‍ॅक्शन
डीबी स्टार चमूने झालेल्या प्रकाराचे पुरावे जमवले होते. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजित बोर्‍हाडे यांना दूरध्वनीवर घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ संपूर्ण शहरातील वाहतूक पोलिसांना वायरलेसवरून या गाडीवर कारवाई झालीच पाहिजे, कारवाई न करता ही गाडी शहराबाहेर जायला नको, असे फर्मान सोडले.

जावई जोरातच
सावध झालेल्या पोलिसांनी मोंढा नाका येथे गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र हूल देऊन ही गाडी पुढे निघाली. पुढे अमरप्रीत सिग्नलवर वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक इलियास खान पठाण यांनी सहकार्‍यांसमवेत ही गाडी ताब्यात घेतली. गाडी सिडको वाहतूक शाखेत आणून जमा केली. तिथे 119, 177 आणि 184 या एमव्ही अ‍ॅक्टनुसार पोलिस कॉन्स्टेबल एस. एस. आडवे यांनी वाहनचालक शहाजी तुकाराम चौरे (38) यांच्यावर 600 रुपये दंड करून कायदेशीर कारवाई केली.

आयुक्त साहेब, सिंघमना संरक्षण हवे
औरंगाबाद शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाले आहेत. गेली तीन वर्षे डीबी स्टार- दिव्य मराठीने वृत्तमालिका प्रसिद्ध केल्या. लोकांमध्ये जनजागृतीसाठी (अ)सुरक्षित वाहतूक ही मालिका सुरू आहे. त्यातून लोकांमध्ये आणि पोलिसांच्या मानसिकतेत बदल होत आहे. मात्र, अशा प्रकारच्या दादागिरीपुढे कर्मचार्‍यांना दर वेळी झुकावे लागत असल्याने पोलिसांची खच्चीकरण होत आहे. या प्रकरणात डीबी स्टार चमू उपस्थित नसता तर वरिष्ठ या कर्तव्यदक्ष पोलिसांच्या पाठीशी राहिले असते काय, हा प्रश्न सगळे विचारत आहेत. आता तर न्यायालयानेच आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणार्‍या पोलिसांना आयुक्त राजेद्र सिंग यांनी आणखी बळ देणे आवश्यक असल्याची उपस्थितांची प्रतिक्रिया आहे.
काय म्हणतात एसीपी
४डीबी स्टारकडून माहिती प्राप्त होताच वाहतूक पोलिसांना वायरलेसवर गाडी ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. यासाठी पोलिस उपनिरीक्षक इलियास पठाण यांचे स्वतंत्र पथक कामाला लावले. त्यांनी हॉटोल अमरप्रीतजवळ ते वाहन पकडले. वाहतूक पोलिसांक डून मिळालेल्या माहितीनुसार कलम 356 नुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, मात्र संबंधितांनी माफी मागितल्यानंतर एमव्ही अ‍ॅक्टनुसार कारवाई करून सहाशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. ते पोलिस अधिकार्‍यांचे नातेवाईक होते. यातील ज्या उपनिरीक्षकांनी सरकारी कामात अडथळा आणला आणि वाहनधारकांना परस्पर मदत केली त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार आहे.
- अजित बोर्‍हाडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा
हा तर राजकीय दबाव
४वाहतूक पोलिसांशी त्यांनी वाद घातल्याची माहिती वायरलेसवरून एसीपी साहेबांनी आम्हाला दिली. काही राजकीय व प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने त्यांनी माफीही मागितली; पण आम्ही त्यांना सिडको वाहतूक शाखेत नेले. तिथे मोटार वाहन अ‍ॅक्टनुसार 600 रुपयाचा दंड ठोठावला. इलियास पठाण, पोलिस उपनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा

प्रकरण मिटले आहे
४विशेष असे काही घडले नाही. वाहतूक पोलिस सरकारी कामात अडथळा आणणे, धमक्या देणे या प्रकरणात त्यांच्यावर 353 दाखल करणार होते. पण लोक प्रतिष्ठित होते. मध्यस्थीने हे प्रकरण मिटवले. मोटार वाहन कायद्यानुसार सहाशे रुपयांचा दंड झाला.
- सचिन देसरडा
माझा संबंध नाही
४या प्रकरणाशी माझा संबंध नाही. मी महत्त्वाच्या कामात असल्याने एक तासानंतर संबंधितांना फोन केला, मात्र त्या प्रकरणाचा निपटारा झाल्याचे कळले. ते माझे नातेवाईक जरी असले तरी सचिन देसरडा या माझ्या लहान भावाने कारवाईनंतरच वाहन ताब्यात घेतले.
- प्रशांत देसरडा, माजी उपमहापौर
छायाचित्र - जळगाव टी पॉइंटवर सुसाट वेगात येऊन सिग्नल तोडणारी हीच ती स्कॉर्पिओ जीप (एमएच-45 एन 1515). रविवारी सायंकाळी पोलिसांशी वाद सुरू असताना टिपलेले हे जीपचे छायाचित्र.