आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोध उत्तर भारतात, कुटुंब सापडले औरंगाबादेतच! दहा वर्षीय मुलाचे कुटुंब शोधण्यात पोलिसांना यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मध्यवर्ती बसस्थानकावर दहा वर्षांचा मुलगा सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार तास मोठी कसरत केली. पोलिस महासंचालक कार्यालय, दिल्ली, आग्रा, मुरादाबाद, बिजनौर आदी गावांत संपर्क साधून कुटुंबाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आणि अखेर शहरात मुलाच्या असलेल्या नातेवाइकाची माहिती मिळाली. समीर कमरोद्दीन अन्सारी (१०, रा. हरगदपूर, जि. बिजलोर, उत्तर प्रदेश) असे या चिमुकल्याचे नाव आहे.
 
जुलै रोजी कमरोद्दीन अन्सारी हे समीरसह जिन्सी परिसरात राहणाऱ्या मामाकडे आले होते. त्याला नातेवाइकाकडे सोडून ते कामानिमित्त नगर जिल्ह्यातील दौंड येथे गेले. बुधवारी खेळता खेळता समीर बेपत्ता झाला. याप्रकरणी त्याच्या मामांनी जिन्सी पोलिसांत तक्रार दिली. समीर जिन्सी परिसरातून पायी चालत थेट मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचला होता. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास क्रांती चौक पोलिस ठाण्यातील मुस्कान पथकाला समीर आढळला. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला हिंदी किंवा मराठी भाषा समजत नव्हती. दुभाषकाच्या मदतीने चौकशी केली असता त्याने उत्तर प्रदेश आणि स्वत:चे नाव सांगितले. 

क्रांती चौक ठाण्यात बसवून पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. दुपारी साडेचार वाजेपासून त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले. पोलिस महासंचालक कार्यालयाशी संपर्क साधून दिल्ली, आग्रा, मुरादाबाद, बिजलोर नकनौर पोलिसांशी क्रांती चौक पोलिसांनी संपर्क साधला. या सर्व प्रक्रियेत समीर हा हरगदपूरचा असल्याचे समोर आले. 

राजस्थान उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या नकनौर पोलिस ठाण्यापासून समीरचे गाव ४० किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नकनौर पोलिसांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे नियंत्रण कक्षाने नकनौर पोलिसांना समीर सापडल्याची माहिती दिल्यावर तेथील उपनिरीक्षकाने समीरच्या गावातील सरपंचांशी संपर्क साधला. तेथील सरपंचाने तत्काळ गावातील समीरच्या घरी जाऊन औरंगाबादेतील नातेवाइकांची माहिती घेऊन पोलिसांना दिली. त्यानंतर समीरच्या मामाचा पत्ता पोलिसांना सापडला. दुपारी साडेतीन वाजता सुरू केलेला शोध सायंकाळी साडेसहा वाजता संपला. समीरचे वडील कमरोद्दीन अन्सारी यांना हा प्रकार कळताच त्यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि समीरला कडकडून मिठी मारली. 

मुस्कान पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जयश्री खोगरे, शिपाई विनोद नितनवरे, विशाल पाटील, पी. आर. बमणे यांनी कामगिरी केली. भारतीय रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी या प्रकरणात पोलिसांना सहकार्य केले. मुलाला आई-वडिलांच्या स्वाधीन करताना उपायुक्त विनायक ढाकणे, निरीक्षक अनिल आडे यांची उपस्थिती होती. 

उत्तम समन्वयामुळे समीरच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’
पोलिसयंत्रणेने परस्परांशी उत्तम समन्वय राखल्याने ठिकठिकाणच्या नियंत्रण कक्षाला माहिती देऊन उत्तर प्रदेशातील समीरच्या गावाचा शोध अवघ्या चार तासांत घेणे शक्य झाले आणि चिमुरड्या समीरला त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ फुलवता आली. 
बातम्या आणखी आहेत...