आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Suicide Case In Aurangabad Ghati Hospital

हृदयद्रावक: .आणि क्षणार्धात अख्खी ओपीडी रिकामी झाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घाटीची ओपीडी दर बुधवारी असते. तशी ती नेहमीप्रमाणेच रुग्णांनी आजही गच्च भरली होती. सुमारे दीड हजार रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर-कर्मचारी असे सगळेच आपापल्या कामात व्यस्त होते. अचानक ओपीडीच्या बाहेरून शक्तिशाली आवाज आला आणि काही कळायच्या आत लोक सैरावैरा धावू लागले. कुणी म्हणू लागले बॉम्बस्फोट झाला, कुणी म्हणाले छत कोसळले, तर कुणी पुटपुटले गाडीचे टायर फुटले.. नेमके कारण कुणालाच कळेना ! भययुक्त कुतुहलामुळे अख्खी ओपीडी घाटीच्या इमारतीबाहेर आली. या गर्दीने बाहेरचे जे चित्र बघितले ते धक्कादायक होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) बाहय़रुग्ण विभागाची (ओपीडी) स्वतंत्र इमारत ही शासकीय दंत महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. या इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी दोन गेट आहेत. प्रशस्त पोर्चमधूनच इमारतीमध्ये प्रवेश करावा लागतो. याच पोर्चमध्ये पोलिसांची गाडी उभी होती आणि नेहमीप्रमाणे कैद्यांच्या तपासणीसाठी पोलिसांनी त्यांना ओपीडीत आणले होते.

सहसा पोलिस कैद्यांना मागच्याच गेटने नेतात आणि गाडीही मागेच उभी असते. बुधवारीदेखील काही कैद्यांना मागच्या गेटने तपासणीसाठी नेण्यात आले होते. गाडीचा ड्रायव्हर आणि एक बंदूकधारी पोलिस गेटच्या बाहेर उभा होता. इकडे बाहय़रुग्ण विभागात रुग्ण-नातेवाईक-डॉक्टर-कर्मचार्‍यांची भली मोठी गर्दी होती. घाटीच्या ओपीडीमध्ये कधीही दीड-दोन हजार रुग्ण असतातच. त्यामुळे नऊ ते साडेबारापर्यंत ओपीडीमध्ये तोबा गर्दी असते आणि बुधवारीही वेगळे चित्र नव्हते. मात्र बाराच्या सुमारास अनपेक्षितपणे जोराचा आवाज घुमला आणि संपूर्ण घाटी हादरली.

तर्क-वितर्कांना उधाण: भयभीत करणार्‍या आवाजामुळे घाटीची ओपीडी जणू स्तब्धच झाली. आवाज ऐकणार्‍या बहुतेकांच्या पोटात भीतीने गोळा उठला. दुसर्‍याच क्षणाला लोक सैरावैरा धावू लागले.

मागच्या गेटजवळून ही पळापळ सुरू झाली आणि इमारतीच्या बाहेर पडणारे लोक पुन्हा आत पळत सुटले. लोकांचे एकाएकी ओरडणे आणि गोंधळ सुरू झाला. हा भला मोठा आवाज ओपीडीच्या बाहेरून आला, एवढेच काय ते लोकांना कळून चुकले होते. काहीजण बाँबस्फोट झाला म्हणून पळत सुटले, काहीजण छत कोसळल्याचे ओरडू लागले, तर काहींना गाडीचे टायर फुटल्यासारखे वाटले. नेमके कुणालाच काही कळत नव्हते आणि त्यामुळे जो तो ओपीडीच्या बाहेर पळू लागला. बघता-बघता ओपीडीतील बहुतेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर-तंत्रज्ञ-कर्मचारी-सफाईकामगार असा सगळा लोंढा बाहेर आला आणि बघतात तो एक पोलिस कर्मचारी रक्ताच्या थारोळ्यात अखेरचे श्वास घेत होता. रमेश शुक्ला असे त्याचे नाव. हनुवटी, तोंड, डोक्यातून भळाभळा रक्त वाहात होते. एका बाजूला त्याची बंदूक पडली होती. एव्हाना पोलिसाने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींना कळून चुकले होते. हनुवटीजवळून बंदूक झाडल्यामुळे गोळी थेट कवटीसह मेंदू छेदून बाहेर निघाली होती. पोर्चच्या छताला छोटे भोक पडले होते.

यावेळी पोलिस उशिराच आले : पोलिसाने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे लक्षात येताच, काहीजणांनी बेगमपुरा पोलिसांना तातडीने कळविले. मात्र कळवूनही हाकेच्या अंतरावर असलेल्या बेगमपुर्‍यातून तब्बल अध्र्या तासानंतर पोलिस आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नागरिकांसाठी अनेकदा वेळेवर न येणारे पोलिस आपल्या विभागातील कर्मचार्‍याच्या आत्महत्येनंतरही वेळेवर येत नाहीत, हे त्यांचे त्यांनीच सिद्ध करून टाकले. सेन्ट्रल नाका स्मशान भुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न
आवाजानंतर अवघ्या दोन मिनिटांत अधीक्षक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल चौहान यांनी पळतच ओपीडी गाठली. पोलिस कर्मचार्‍याचा श्वास मंदावला होता. त्याची अवस्था मृतवत झाल्यासारखीच होती; तरीही डॉ. चौहान यांनी कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा आणि छातीवर दाब देऊन हृदय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. इतर वैद्यकीय अधिकारी डॉ. युसूफ मणियार, डॉ. हिना खान, मेडिसिन विभागाचे डॉ. सुरवडे आदी मंडळीही कामाला लागली. मात्र, काही उपयोग होत नसल्याचे लक्षात येताच त्याला स्ट्रेचरवरून अपघात विभागात नेण्यात आले. सात-आठशे लोकांच्या गर्दीमधून स्ट्रेचर नेण्यासाठी घाटीतील सुरक्षा रक्षक तैनात करावे लागले. गोळी झाडण्यापूर्वी तो पोलिस अगदी सर्वसामान्यपणे वावरत होता, असेही त्या वेळी पोर्चमध्ये असणार्‍यांनी आवर्जून सांगितले.