रेल्वेस्थानकावरील बेशिस्त रिक्षाचालक आणि अस्ताव्यस्त पार्किंगच्या व्यवस्थेवर डीबी स्टारने कोरडे ओढल्यामुळे आता तेथे सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे. सिक्स सीटर रिक्षांवर कारवाई करण्याबरोबरच गणवेशात नसलेल्या रिक्षाचालकांना वाहतूक शाखेच्या पोलिस रेल्वेस्थानकात प्रवेश करण्यास मज्जाव करणे सुरू केले आहे. त्यामुळे रिक्षाचालक आता गणवेश परिधान करूनच या ठिकाणी येत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. रिक्षा वाहतूक आणि एकूणच येथील व्यवस्थेला शिस्त लागत आहे.
रेल्वेस्थानकावरून ये-जा करणा-या प्रवाशांना सुरक्षित वाहतूक करता यावी यासाठी प्रीपेड रिक्षा योजना राबवण्यात आली. पण येथून मोठ्या प्रमाणावर रिक्षा अवैधपणे प्रवासी वाहतूक करत होत्या. त्यामुळे प्रीपेड योजनेवर विपरीत परिणाम झाला. तसेच स्थानकातील सिक्स सीटरची अस्ताव्यस्त पार्किंग आणि प्रवाशांची ओढताण, याचाही प्रवाशांना कायम त्रास सहन करावा लागत होता. यावर डीबी स्टारने 4 मे रोजी ‘चक्रव्यूहात अडकली प्रीपेड योजना’, तर 15 जून रोजी ‘प्रीपेड रिक्षापुढील गतिरोधक कायम’ या मथळ्यांखाली वृत्ते प्रसिद्ध केली. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. चमूने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी बेशिस्त व अवैध रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. सीटर रिक्षा, विनापरवानाधारक चालकांना तसेच गणवेशात नसलेल्या रिक्षाचालकांना रेल्वेस्थानकाबाहेर घालवण्यात येत आहे.
कॉन्स्टेबलच्या प्रयत्नांना यश
रेल्वेस्थानकातील बेशिस्त वाहतूकीला लगाम लावण्यासाठी कॉन्स्टेबल राकेश देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकांची अनौपचारिक बैठक घेतली. यामध्ये त्यांनी रिक्षाचालकांचे समुपदेशन करत वाहतूक नियमांची उजळणी घेतली. या बैठकीला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व रिक्षाचालकांनी नियमित गणवेश परिधान करण्याचा निर्णय घेतला. तसेच गणवेशात नसलेल्यांना रेल्वेस्थानकात प्रवेशास मज्जाव करण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला.
चालकांनी दिला प्रतिसाद
रेल्वेस्थानकावरील प्रीपेड रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन तसेच गणवेशातच व्यवसाय करू, असे स्पष्ट केले. गणवेश हा प्रवाशांबरोबर चालकांनाही फायद्याचा आहे. प्रीपेड रिक्षाचालक नेहमीच प्रवाशांचे हित जोपासत असून विसरून राहिलेल्या अनेक मौल्यवान वस्तू परत केल्याचे दाखले अनेक रिक्षाचालकांनी या वेळी दिले.
दरपत्रकाअभावी वाद
जानेवारीमध्ये प्रीपेड रिक्षांच्या दरांमध्ये वाढ झाली होती; परंतु यानंतर आरटीओ किंवा वाहतूक शाखेकडून नवीन दरपत्रक उपलब्ध झाले नाही. त्यामुळे प्रवासी व रिक्षाचालकांमध्ये भाड्यावरून वाद होत आहेत. मंगळवार, दि. 17 जून रोजी एका आजीबार्इंना आकाशवाणी चौकासाठी 120 रुपये भाडे सांगण्यात आले. यामुळे आजींना रिक्षात बसवणा-या सुभाष राख व रिक्षाचालकांमध्ये वादावादी झाली. मात्र, हा रिक्षाचालक नवीन असून अशा चालकांमुळे प्रीपेड रिक्षा बदनाम होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर करवाई करण्याची मागणी इतर चालकांनी केली.