आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉन्स्टेबलच्या पत्नीला पोलिस कल्याण निधीचा आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने डोक्यावरचे छत्र हरपले आणि अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी आल्याने मोठे संकट ओढवले, पण अशा परिस्थितीतही धीर न गमावता पोलिस कल्याण निधी विभागाकडून हडकोत चालवल्या जाणार्‍या पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करून शहरातील उषा दिलीप घोरपडे या ताठ मानेने जगत आहेत.

कल्याण निधीतून आजवर अनेकांना आर्थिक आधार मिळाला. परंतु पोलिस कर्मचार्‍याच्या निराधार पत्नीला खासगी नोकरी मिळवून देण्याची ही पहिलीच घटना आहे.

पेट्रोल पंपावर काम जमेल का नाही याची भीती उषा यांना वाटायची, पण नियतीने असामान्य काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचा विचार केला आणि हसत त्यांनी जबाबदारी स्वीकारली. उषा या मूळ उंडणगावच्या. पती दिलीप यांच्या नोकरीनिमित्त त्या औरंगाबादेत स्थायिक झाल्या. पतीच्या निधनानंतर दोन मुले आणि एका मुलीची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी स्वत:च्या पायावर त्यांना उभे राहणे भाग होते. शिक्षण नसल्याने अनुकंपावर नोकरी मिळणे अवघड होते. परंतु पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या पुढाकाराने तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन उषा यांना हडकोतील पंपावर नोकरी मिळाली.

मुलीने दिली हिंमत
पती हयात असताना उषा नोकरीसाठी घराबाहेर पडल्या नाहीत. शिक्षणही अत्यंत कमी. व्यावहारिक जगात वावरण्याचा अनुभव नसल्याने जगायचे कसे, हा मोठा प्रश्न होता. शिवाय नातेवाइक अन् समाजाची धास्ती वेगळीच. पंपावरील नोकरी स्वीकारायची की नाही याबाबत मनात द्विधा मन:स्थिती असताना 14 वर्षांची मुलगी ऐश्वर्याने धीर दिला. कुटुंबाच्या गरजेपुढे कोणाचा काय विचार करायचा हे तिचे म्हणणे उषा यांना पटले आणि त्यांनी नोकरी स्वीकारली.

पोलिस आयुक्तांचे सहकार्य
माणसांच्या गर्दीत काम करताना सुरुवातीला अवघडल्यासारखे वाटायचे. मात्र, पोलिस आयुक्त संजयकुमार, उपायुक्त सोमनाथ घार्गे, निरीक्षक अविनाश आघाव यांनी खूप सहकार्य केले. मला प्रशिक्षण दिले. पंपावर काम करणार्‍या सहकार्‍यांनी तिथलं काम शिकायला मदत केली. - उषा घोरपडे.

चांगला प्रतिसाद
महिला ग्राहकांना पंपावर उत्तम सेवा पुरवण्यासाठी महिला कर्मचारी असावी, असे वाटल्याने आम्ही हा प्रयोग करून पाहिला. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिलीप तिवारी, पोलिस नाईक-पेट्रोल पंपप्रमुख.