आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या फौजदाराच्या पत्नीची छेड काढणार्‍या इंजिनिअरला बदडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जनशताब्दी एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या नाशिकच्या फौजदाराच्या पत्नीची छेड काढणार्‍या अँरोनॉटिकल इंजिनिअरला डब्यातील प्रवाशांनी चांगलेच चोपून काढले. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनीही हिसका दाखवताच छेड काढल्याची कबुली त्याने दिली. हा प्रकार मंगळवारी (6 मार्च) रात्री साडेसातच्या सुमारास नाशिक-औरंगाबाददरम्यान प्रवासात घडला. विनयभंग करणारा नाशिक येथील एचएएल (हिंदुस्तान अँरोनॉटिकल लिमिटेड) कंपनीत इंजिनिअर असून तो जालना येथील रहिवासी आहे.

नाशिक येथे पोलिस उपनिरीक्षकाने त्यांच्या 41 वर्षीय पत्नीला औरंगाबाद येथे जाण्यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये बसवून दिले. महिलेच्या मागील आसनावर बसलेल्या नीरज नरेंद्र मुळे (रा. जालना, 29) याने महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली. चुकून हात लागला असावा, असा समज झाल्याने प्रारंभी तिने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, तरुण अतिरेक करत असल्याचे लक्षात येताच तिने आरडाओरड केली. प्रारंभी जवळच बसलेले प्रवासी या महिलेच्या मदतीला आले नाहीत. मात्र, औरंगाबाद येथील प्राध्यापक भारत खैरनार आणि भूपेंद्र मेहता यांनी त्या महिलेकडे धाव घेतली. मुळेची आगळीक लक्षात येताच त्यांनी त्याला बदडून काढले. इतर सहप्रवाशांनी मुळेला जखडून ठेवले व गाडी औरंगाबादला येताच रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. येथेही पोलिसांनी त्याची धुलाई केली. संबंधित महिला औरंगाबाद येथील नातेवाइकाला भेटण्याठी आली होती. एचएएल कंपनी सरकारी आस्थापना असल्याने इंजिनिअर तरुणावर फौजदारी कारवाई केल्यास त्याची नोकरी जाईल, अशी काळजी वाटल्याने त्या महिलेने तक्रार दिली नाही. मंगळवारी रात्री अकरा वाजेपर्यंत पोलिसांनी त्याला ठाण्यात बसवून ठेवले होते. महिलेच्या विनंतीवरून त्याला सोडून दिले.