आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Policy Actions That Are Not Auto Driver Sevens Hills Discipline On The Bridge!

पोलिसी खाक्या दाखवताच बेशिस्त रिक्षाचालक सेव्हन हिल्स पुलावर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली अकारण गर्दी करणार्‍या रिक्षांना पुलाखाली उतरण्यास मज्जाव करण्याची पोलिस आयुक्त संजयकुमार यांची मात्रा आज चांगलीच लागू पडली. मंगळवारी पुलाखाली रिक्षाबंदीची घोषणा करताच बुधवारी सकाळपासूनच रिक्षाचालकांनी त्यांची वाहने सेव्हन हिल्स उड्डाणपुलावरून दामटण्यास सुरुवात केली. सकाळी नऊपासून रिक्षा पुलावरून धावू लागल्या. दुपारी बारा वाजेपर्यंत दोन हजार रिक्षा पुलावरून धावल्या. आयुक्तांचा आदेश शिरसावंद्य मानून वाहतूक पोलिस पुलाच्या दोन्ही टोकांकडे बॅरिकेड्स लावून उभे होते. नजर चोरून खालून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या रिक्षाचालकांना ते पुलावरून पिटाळत होते.
सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली रिक्षांमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पुलाखालील वाहतूक सुरळीत झाली आणि पादचारी, दुचाकी, चारचाकीचालकांना रस्ता मोकळा झाल्याने हायसे वाटले. आयुक्तांच्या या निर्णयाचे व्यावसायिक, नागरिकांनी मनापासून स्वागत केले. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने बुधवारी रिक्षांना सेव्हन हिल्स उड्डाणपुलावरून जाण्याची सक्ती करण्यात आली. रिक्षाचालक उड्डाणपुलाचा वापर करत नसल्याने पुलाखाली वाहतूक कोंडी होत असल्याच्या बाबीवर
रिक्षाचालकांची पोलिसांशी हुज्जत
कारवाईमुळे रिक्षाचालकांनी उड्डाणपूल सुरू होण्याच्या अगोदरच थांबा बनवला. रिक्षांना मार्ग दाखवण्यासाठी केवळ दोन पोलिस होते. सिडकोकडून बाबा पंपाकडे जाणार्‍या रिक्षांना पोलिसांनी पुलावरून जाण्यास भाग पाडले, पण बाबाकडून सिडकोकडे जाणार्‍या अनेक रिक्षाचालकांनी रुग्णालयात जाण्याचे सांगून पुलाखालूनच रिक्षा दामटल्या. काहींनी पोलिसांशी हुज्जतही घातली. हेडगेवार रुग्णालयाकडे जाण्यासाठी आकाशवाणीचा चौक जवळ पडतो, तर एमजीएममध्ये जाण्यासाठी एअर इंडिया ऑफिसजवळील रस्ता जवळ आहे. ही बाब प्रवाशांनी लक्षात घ्यायला हवी, असे मत रिक्षाचालकांनी व्यक्त केले. या पॉइंटवर अधिक कर्मचारी नेमावेत, असे नागरिकांनी म्हटले.
नागरिकांची पोलिसांना शाबासकी
महिनाभरापूर्वी ‘दिव्य मराठी’ने केलेल्या सर्वेक्षणात जालना रस्त्यावर धावणार्‍या 10 हजार रिक्षांपैकी केवळ 20 रिक्षांनी सेव्हन हिल्स उड्डाणपुलाचा वापर केल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, बुधवारी पोलिसांनी सक्ती केल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंनी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत दोन हजार रिक्षा उड्डाणपुलावरून धावल्याचे बंदोबस्तावरील पोलिस कर्मचार्‍यांनी सांगितले. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने केलेल्या सर्वेक्षणात सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 1 हजार रिक्षा धावल्याचे समोर आले. रात्री नऊ वाजेपर्यंत उड्डाणपुलाजवळ उभे राहून पोलिस रिक्षाचालकांना पुलाची वाट दाखवत होते. वाहतूक पोलिसांचे हे कार्य खरेच कौतुकास्पद होते.
मीटर रिक्षांना परवानगी द्या
शिवाजीनगर, टीव्ही सेंटरकडून येणार्‍या प्रवाशांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. किमान मीटर रिक्षांना पुलाखालून जाण्यास परवानगी हवी. सचिन पोपळघट, प्रवासी
बेशिस्तपणामुळे ही वेळ
रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणामुळे ही वेळ आली आहे. रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होईल. शिस्तीसाठी ही बाब आवश्यक आहे. हरिदास जाधव, रिक्षाचालक.
त्रास कमी झाला
महिला, ज्येष्ठ नागरिकांना पुलाखालून जाणे कठीण होते. नवीन नियमामुळे त्यांचा हा त्रास कमी होईल. पोलिसांचे अभिनंदन. शैलेश भिसे, वाहनधारक
सिटी बस नसल्याने रिक्षाने जावे लागते. सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली बसचा थांबा आवश्यक आहे. शिवाय बसच्या फेर्‍या वाढवाव्यात. भगवान नाईक, प्रवासी.
पहिल्यांदा रस्ता मोकळा
दर मिनिटाला येथे वाहतूक कोंडी होते. अनेक वर्षांपासूनची ही स्थिती आहे. उड्डाणपूल झाल्यापासून पहिल्यांदा पुलाखालील रस्ता एवढा मोकळा दिसला. शुभम सावजी, व्यावसायिक.
नियम आवश्यकच
रिक्षाचालकांचा बेशिस्त वागणुकीला यामुळे लगाम लागेल. वाढत्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी अशा नियमांची आवश्यकता आहे. रमेश केरे, वाहनधारक.
वाहतुकीवरील ताण कमी
सकाळपासून दुपारपर्यंत दोन तासांत सर्व रिक्षा उड्डाणपुलावरून गेल्या. त्यामुळे पुलाखालील वाहतुकीवरील ताण कमी झाला. बापू डोंबाळे, वाहतूक पोलिस.
येथेही लक्ष देण्याची गरज पैठणगेट ते गुलमंडी, रंगारगल्ली, सिटीचौक, शहागंज ते गांधी पुतळा, मंजूरपुरा, लोटाकारंजा, बुढीलेन, गोमटेश मार्केट, मध्यवर्ती बसस्थानक, अदालत रोड, फाजलपुरा या रस्त्यांवर नो एंट्री असल्यामुळे वाहनधारक राँग साईडने वाहन दामटतात. शिवाय एसबीओए शाळेसमोर रिक्षाचालक मध्येच रिक्षा थांबवतात. त्यामुळे अपघात घडत असल्याने या ठिकाणी वाहतूक कर्मचारी नेमून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
काय होती अडचण ?
गजानन महाराज मंदिर, सिडको, बाबा पेट्रोल पंप, टीव्ही सेंटर या भागांतून येणारी सर्व वाहने सेव्हन हिल्स पुलाखाली एकत्र येतात. शिवाय जालना रस्त्यावर ये-जा करणारे 10 हजार रिक्षा प्रवासी मिळवण्यासाठी या रस्त्याचा वापर करत होते. त्यामुळे पुलाखाली वाहतूक कोंडी होत होती. बुधवारी दिवसभर वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रिक्षांना पुलाखालून जाण्यास मज्जाव केला.
कारवाईत सातत्य हवे
कोणीतरी नेता येत आहे म्हणून रिक्षांना पुलावरून जाण्यास सक्ती केली जात असल्याचे बुधवारी अनेक वाहनधारकांना वाटले. परंतु रिक्षांना पुलाखालून बंदी घातल्याचे कळल्यानंतर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. बुधवारी राँग साइड जाणार्‍यांचे प्रमाणही कमी होते. कारवाईत सातत्य हवे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.