आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड तालुक्यात पोलिओ रुग्ण आढळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - पोलिओची संशयित रुग्ण सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद या गावी आढळल्याने आरोग्य विभागाच्या यंत्रणेने रहिमाबादच्या परिसरात तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
निकिता हरिदास उबाळे (८) या छोट्या मुलीची प्रकृती ठीक नसल्याने तिला उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले होते. या वेळी तिला पोलिओ असल्याची बाब तपासणीनंतर समोर आली. निकिताच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉ. एम. पी. मेहेर यांनी दिली. मागील आठवड्यात निकिताला ताप आल्यानंतर लगेच तिचे तोंड वाकडे झाल्याने हा पॅरालिसिस असावा, असे तिच्या आई-वडिलांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी निकिताला तत्काळ औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासणी करून हे पोलिओचे लक्षण असल्याचे स्पष्ट केले व त्यानुसार तिच्यावर उपचार सुरू केले. अद्याप तिच्या रक्ताच्या नमुन्याचे अहवाल पुण्याहून आले नाहीत. दरम्यान, जिल्ह्यात पोलिओसदृश रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पालोदच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक रहिमाबाद व आसपासच्या दोन गावांत तपासणीसाठी दाखल झाले. ० ते ५ वयोगटातील मुलांना पोलिओचे डोस देण्यात आले. आरोग्य विभागाच्या यंत्रणेने खबरदारी म्हणून ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी केली असल्याचेही डॉ. मेहेर यांनी सांगितले. दरम्यान, पुण्याच्या प्रयोगशाळेतील िनकिताच्या रक्ताचा अहवाल आल्यानंतरच तिला पोलिओ आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे.