आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Colour To Marathwada Sahitya Parishad Election

मसापच्या निवडणुकीला राजकीय रंग, मतदारांवर दबाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेची निवडणूक यंदा अतिशय चुरशीची होत असून मतदारांच्या हातात मतपत्रिका पडताच त्या सह्या करून कोऱ्याच आमच्याकडे पाठवा अशा विनंतीवजा दबावामुळे मतदार हैराण झाले आहेत. या निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण समर्थित परिवर्तन पॅनल व प्रस्थापितांचे म्हणजे कौतिकराव ठाले यांच्या पॅनेलमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असताना मसाप विकास आघाडी या तिसऱ्या अपक्षांच्या पॅनलने चक्क पोलिस आयुक्तांकडे धाव घेत मतदारांवर दबाव आणणाऱ्यांवर कारवाई करा, अशा उमेदवारांचे फोन टॅप करा अशी मागणी केली आहे.

मसापची निवडणुकीच्या मतपत्रिका २६०० मतदारांना पाठवण्यात आल्या असून, बहुतेकांना त्या मिळाल्या आहेत. मतदारांनी या मतपत्रिका भरून पोस्टाने २० आॅगस्टपर्यंत पाठवायच्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत मसापवर वर्चस्व असलेल्या कौतिकराव ठाले यांच्या पॅनलला आमदार सतीश चव्हाण यांचे समर्थन असलेल्या परिवर्तन पॅनलने आव्हान दिले आहे. शिवाय मसाप विकास आघाडी ही एक अपक्षांची आघाडीही रिंगणात उतरली आहे. एकूण २२ जागांसाठी ५२ उमेदवार तीन पॅनलने उभे केले आहेत.

मतपत्रिका रवाना होताच मतदारांना फोन करून प्रचार केला जात आहे. याच प्रचारात गैरप्रकार व दबाव तंत्र वापरले जात असल्याचा आरोप मसाप विकास आघाडीने केला आहे. या संदर्भात त्यांनी चक्क पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देत यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
प्रा. विनय हातोले, डाॅ. विलास गाजरे, प्रा. मोहन सौंदर्य, डाॅ. बाळासाहेब लिहीणार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, काही उमेदवार मतदारांना फोन करुन सह्या करून कोऱ्या मतपत्रिका आणून द्या असे सांगत दबाव टाकत आहेत. अशा उमेदवारांचे फोन टॅप करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली.
मतदान करायचे ते मतदारांनाच ठरवू द्या
याबाबत दिव्य मराठीशी बोलताना प्रा. हातोले म्हणाले, मसापचा मतदार हा प्राध्यापक, साहित्यिक वर्गातला आहे. त्यांचे या बड्या लोकांकडे काम सतत अडते. त्यामुळे ते त्यांच्या दबावाखाली येऊ शकतात. शिवाय या प्रस्थापितांच्या विरोधात गेले तर मसापतर्फे यांचा कायम पत्ता कापला जातो. अनेकांना असा अनुभव आला आहे. ना साहित्य अथवा कविसंमेलनात सहभागी होऊ दिले जाते ना कुठे बोलावले जाते. त्यामुळे त्यांना रोखायला हवे. लोकशाही मार्गाने कोणाला मतदान करायचे ते मतदारांनाच ठरवू द्या, असे ते म्हणाले.