आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत राजकीय कुरघोडी; सभापतींना टाळून मनसे सदस्य मुंबईला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मनसेच्या वतीने जिल्हा परिषदेवर राज्यातील पहिला मनसेचा अध्यक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी मनसे सदस्यांकडून मुंबईवारी सुरू आहे. मात्र, बांधकाम सभापती डॉ. सुनील शिंदे आणि शिक्षण सभापती बबन कुंडारे यांना टाळले जात असल्याचे समोर आले आहे. बुधवारी (28 ऑगस्ट) मनसेचे सहा सदस्य मुंबईला असताना दोन्ही सभापती मात्र शहरातच असल्याचे दिसून आले.

नाहिदाबानो पठाण यांचे अध्यक्षपद रिक्त झाल्यापासून मनसेला अध्यक्षपदाचे डोहाळे लागले आहेत. त्यानुसार त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. तसेच दुसरीकडे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन मनसेचा अध्यक्ष करण्याचे स्थानिक गणितही सांगितले. संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांची वारंवार भेट घेऊन पुढील हालचाल करण्याचे साकडेही घालण्यात आले. मात्र या सर्वात दोन्ही सभापती दूर असल्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

बैठकांमुळे गेलो नाही
वरिष्ठांकडून बोलावणे आले नाही. यापूर्वीच राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. जिल्हा परिषदेत बैठक असल्याने मी मुंबईला गेलो नाही.
-डॉ. सुनील शिंदे, सभापती, बांधकाम समिती

सभापतींना कळवले
आम्ही मुंबईला नारकर यांच्या भेटीला जाणार असल्याची कल्पना दोन्ही सभापतींना देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या अडचणींमुळे ते आले नाहीत.
-शैलेश क्षीरसागर, मनसे गटनेता

उद्या बोलणी करणार
मनसे सदस्यांशी आज पुन्हा चर्चा करणार असून गुरुवारी आघाडीशी बोलणी करणार आहे. तसेच पर्याय म्हणून इतर पक्षांशीही बोलणी सुरू आहे.
-सतीश नारकर, मनसे संपर्क अध्यक्ष

मला माहितीच नाही
मुंबईला सदस्य जाणार असल्याचे मला माहितीच नाही. तशी कल्पना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आली नाही. त्यामुळे मी शहरातच आहे.
-बबन कुंडारे, सभापती, शिक्षण व आरोग्य