आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय कोपरखळ्यांमध्ये रंगला आमदार झांबड यांचा सत्कार सोहळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सुभाष झांबड यांचा सत्कार समारंभ आज भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तापडिया नाट्यमंदिरात थाटामाटात झाला. झांबड यांच्या सत्कारासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी अक्षरश: रांगा लावल्या होत्या. झांबड पती-पत्नींचा सत्कार समारंभ तब्बल दीड तास चालला. राजकीय कोपरखळ्यांच्या जुगलबंदीत तो रंगतदार ठरला. येत्या सहा वर्षांच्या काळात हातून चांगले कार्य होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे झांबड यांनी सांगितले.

सोहळ्यात आमदार अब्दुल सत्तार यांनी झांबडांच्या विजयाचा दर्डांनाच त्रास होऊ शकतो असे म्हणत कोपरखळ्यांची बीजे रोवली. एकदा आमदार व्हायचेच, असे झांबड यांनी ठरवले होते. त्यांनी मला माजी आमदार केले अन् नंतरच ते आमदार झाले. दर्डांनाही माजी आमदार करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे झांबड यांचा धोका आम्हा दोघांनाही कायम होता. म्हणून आम्ही दोघांनी मिळून त्यांना आमदार केले. त्यांच्यापासून दर्डांनाच त्रास होऊ शकतो. तेवढे त्यांनी करू नये म्हणजे झाले, असे विनोदाने म्हणत सत्तार यांनी चिमटा काढला.

तुम्ही बुद्धिवादी, सत्तारांच्या नादी लागू नका-संजय शिरसाट : निवडणुकीत कोणीही येते अन् टिकली मारून जाते. सत्तार यांचेही तसेच आहे. झांबड यांना त्यांनीच जास्त त्रास दिला अन् आता तेच र्शेय घेताहेत. बुद्धिवादी वरच्या सभागृहात असतात. तुम्ही बुद्धिवादी आहात. तेव्हा सत्तारांच्या नादी लागू नका. यशस्वी व्हायचे असेल तर त्यांच्यापासून दूर राहा. दर्डा-झांबड दुश्मनी संपली, असे समजायला हरकत नाही, असे संजय शिरसाट म्हणाले.

हरल्याशिवाय जिंकल्याची मजा नाही : सुरेश जेथलिया : मलाही सत्तार यांनी हरवले; पण आता काँग्रेसबरोबर राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. हरल्याशिवाय जिंकण्याची मजा येत नाही. शिवसेनेने मला भरपूर काही दिले असले तरी पुन्हा परतणार नाही, असे जेथलिया म्हणाले.

दर्डांनी आता पाण्यासाठी भांडावे : प्रदीप जैस्वाल : काँग्रेसमधील अनुभव वाईट ठरला म्हणून मी पुन्हा शिवसेनेत परतलो. दर्डांना विनंती आहे, त्यांनी पक्षभेद विसरून मराठवाड्याच्या पाण्यासाठी भांडावे. जायकवाडीच्या पाण्यावर ते काहीच बोलत नाहीत, असे प्रदीप जैस्वाल बोलले.

मी आमदार व्हावे यासाठी तुम्ही मदत करा- ओबेरॉय : तुम्ही सर्व जण आजी-माजी आमदार आहात. कोणी कोठे उड्या घेतल्या म्हणून शक्य झाले; पण मी एकाच पक्षात राहिलो म्हणून आमदार होऊ शकलो नाही. कधी तरी संधी मिळेल. तुम्ही मदत करा. झांबड, तुम्ही आता आमदार झाले तरी वाटणे बंद करू नका.

शहराच्या विकासासाठी एकत्र या : राजेंद्र दर्डा
शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. समांतर जलवाहिनीसाठी काँग्रेसने म्हणजेच राज्य शासनाने प्रयत्न केले. यापुढेही असेच प्रयत्न केले जातील.

या सोहळ्यास उद्योजक मानसिंग पवार, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजया चिकटगावकर, अरुण मुगदिया, माजी आमदार नितीन पाटील, पालिकेतील शिवसेनेचे गटनेते गजानन बारवाल यांच्यासह शहरातील व्यापारी, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.