आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणाऱ्या दादा, भाऊंचे दागिने झाले पेटीबंद, यंदा वर्गणीसाठी बळजबरी नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; अंगावर किमान पावशेर सोन्याचे दागिने घालून तोऱ्यात मिरवणाऱ्या विविध पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांवर पाेलिस आयुक्त अमितेशकुमार यांची करडी नजर अाहे. त्यामुळे आयुक्तांच्या भीतीपोटी अनेकांनी अंगावरील दागिने काढून ठेवले अाहेत. तसेच त्यांच्या वाहनांवर लिहिलेले भाऊ, दादादेखील मिटवण्यात आले आहे.

गळ्यात किमान पाच ते दहा तोळ्यांची साखळी, मनगटात ब्रेसलेट, बहुतांश बोटांत अंगठ्या आणि कंपाळावर टिळा किंवा नीळ लावून मिरवणारे आणि शर्टची दोन बटणे उघडी ठेवून स्वत:ला "दादा' म्हणवत महागड्या चारचाकीमधून फिरणाऱ्यांचे पीक गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर आले होते. चार महिन्यांपूर्वी अमितेशकुमार यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली आणि त्यांनी बारीकपणे सर्वांचा अभ्यास केला. त्यांच्या नजरेतून ही गोल्डन गँग सुटली नाही. या सर्वांच्या यादीसह त्यांचे उद्योग काय आहेत याचे विवरणही मागितले आणि त्यांना एकेकाला बोलावून चांगलेच खडसावले. त्यामुळे अनेकांनी अंगावरील दागिने काढून ठेवले, तर काहींनी त्याचे प्रमाण घटवले आहे.

बेगमपुऱ्यातील संदीप पहेलवान याने भररस्त्यावर तलवारीने केक कापून फुशारकी मारण्यासाठी ते फोटो व्हॉट्सअॅपवर टाकले होते. त्यावर अमितेशकुमार यांनी कारवाई केली. भूखंड घोटाळ्यातील काही कार्यकर्त्यांवरही कडक कारवाई केली. अनेकांचा भूखंडांशी संबंध असल्यामुळे ते अमितेशकुमार यांच्या धाकामुळे शांत बसलेले दिसून येत आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात वर्गणीच्या नावाखाली वारेमाप खंडणी वस्ूल करणाऱ्यांवरही चाप बसला आहे. आपला वाॅर्ड सोडून इतरांच्या वसाहतींमध्ये जाऊन वर्गणी मागणारे गायब झाले आहेत. गुलमंडी, शहागंज या बाजारपेठांतील प्रत्येक व्यापाऱ्याने किमान ५० पेक्षा अधिक गणेश मंडळांना यापूर्वी वर्गणी दिली आहे. मात्र अमितेशकुमार यांच्या थेट कारवाईमुळे वर्गणीच्या रूपात खंडणी मागणारे शांत बसले आहेत.

व्यापाऱ्यांना या वेळी वर्गणी देताना प्रेमाची वागणूक मिळाली. बळजबरीचा प्रकार दिसला नाही. यावर कोणी जाहीरपणे बोलले नसले तरी याचे श्रेय थेट आयुक्तांनाच जाते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात होणारी आर्थिक उलाढाल कमी राहणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.