आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Khaire Danve Submit Election From

खैरे-दानवे एकाच दिवशी अर्ज भरणार;जालन्याला जावे की औरंगाबादला थांबावे? कार्यकर्ते संभ्रमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महायुतीचे औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवे हे दोघेही एकाच दिवशी (2 एप्रिल) अर्ज भरणार असल्यामुळे जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्‍यांची चांगलीच कोंडी झाली आहे. दानवेंकडे जावे लागणार, पण खैरेंसोबत गेले नाही तर पुढे डोक्याला ताप होणार हे उघड असल्यामुळे ही मंडळी सध्या पेचात पडली आहे. दोघेही एकाच दिवशी अर्ज भरणार असल्यामुळे पेच निर्माण झाला असला तरी काही जण जालन्याला जातील, तर काही जण येथे थांबतील, कोण कोठे जाणार हे नंतर ठरवू, असे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी म्हटले आहे.
शनिवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. खैरे यांनी विविध पुरोहितांना विचारून मुहूर्त शोधला तो नेमका 2 एप्रिलचा. दानवे यांनाही 2 एप्रिल शुभ असल्याचे त्यांच्या पुरोहितांनी सांगितले अन् दोघेही एकाच दिवशी अर्ज भरणार हे पक्के झाले. मात्र, यात खरी कोंडी झाली ती औरंगाबाद जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्‍यांची. औरंगाबाद जिल्ह्याचा मोठा भाग जालना लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहावे, ही दानवे यांची अपेक्षा रास्त आहे. परंतु, औरंगाबाद येथे खैरेंसोबत राहिलो नाही तर निवडणुकीनंतर कोंडी होणार असल्यामुळे या मंडळींना थोडीशी धास्ती आहे.
खैरेंसोबत भाजपचे कोणी तरी असणे गरजेचे आहे; परंतु जो कोणी खैरेंसाठी थांबेल त्याच्यावर दानवेंची वक्रदृष्टी असेल, तर जो दानवेंकडे जाईल, त्याला खैरे त्यांच्याच भाषेत सांगायचे तर निवडणुकीनंतर ‘बघून’ घेतील. त्यामुळे पक्षानेच काय तो निर्णय घ्यावा, अशी पदाधिकार्‍यांची अपेक्षा आहे.
दोन्हीकडे उपस्थित राहण्याचा प्रयत्न
बोराळकर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, दोघे कधी अर्ज भरणार याची वेळ बघून निर्णय घेऊ. शक्य होत असेल तर भाजपचे पदाधिकारी दोन्हीकडेही उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील; पण वेळेचे नियोजन जमले नाही तर मात्र काही जण तिकडे जातील आणि काहींनी येथे थांबावे लागेल. कारण शेवटी दोघेही महायुतीचे उमेदवार आहेत. कोण जालन्याला जाणार आणि कोण येथे थांबणार हे पदाधिकार्‍यांबरोबरच दानवे आणि खैरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे पदाधिकारी गायब
भाजपचे शहरातील पदाधिकारी निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून जिल्ह्यातून गायब आहेत. कोणी जालन्यात, तर कोणी बीडला प्रचाराला गुंतले आहेत. औरंगाबाद मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे येथे प्रचाराची गरज नाही, असा युक्तिवाद ही मंडळी करताना दिसतात. दानवे आणि खैरे यांची उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख वेगवेगळी असती तर भाजपचे सर्व चेहरे दोन्हीकडेही दिसले असते. कारण उमेदवारी अर्ज भरताना सोबत राहायचे आणि नंतर पुन्हा जालना व बीडकडे रवाना व्हायचे हे आधीच ठरलेले आहे.