आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Mns Election Issue At Aurangabad, Divya Marathi

औरंगाबादेत मनसेचे इंजिन धावणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महिनाभरापासून सुरू असलेला मनसेचा उमेदवार निवडीचा खेळ अखेर थांबला आहे. औरंगाबादच नव्हे, तर मराठवाड्यात मनसेतर्फे लोकसभेची निवडणूक लढवली जाणार नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी (28 मार्च) मुंबई येथे कृष्णकुंजवर राज ठाकरे यांना भेटायला गेलेल्या कार्यकर्त्यांना राज यांनी असा आदेश दिल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे मराठवाड्यात मनसेचे इंजिन धावणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

औरंगाबादेतून लोकसभेसाठी उमेदवार द्यावा, अशी मागणी घेऊन भास्कर गाडेकर, दिलीप चितलांगे, सतनामसिंग गुलाटी, शैलेश क्षीरसागर, विजय चव्हाण, वैभव मिटकर आणि संकेत शेटे आदी कार्यकर्ते मुंबईला राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. मनसेकडून उमेदवारी मिळावी यासाठी शहरातील अनेक मातब्बर नेते इच्छुक होते. 2009 मध्ये अपक्ष निवडणूक लढवून सुमारे एक लाख मत मिळवणारे शांतीगिरी महाराज यांनीदेखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मुस्लिम मतदार पाठीशी असलेले काँग्रेसचे नाराज उमेदवार उत्तमसिंह पवार हेदेखील मनसेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, राज यांनी मोदींना पाठिंबा दर्शवल्यानंतर पवारांनी माघार घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. शहर अध्यक्ष सुमीत खांबेकर आणि जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर यांनी इच्छुक उमेदवार उद्योजक जे. के. जाधव यांच्यासह शुक्रवारी कृष्णकुंजवर धाव घेतली होती. मात्र, राज यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आले नाही. जिल्हा परिषदेत उत्तम कामगिरी करूनदेखील पक्ष लोकसभा निवडणूक का लढवत नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

आले ठाकरेंच्या मना, तेथे कोणाचे चालेना!
वर्षभरात राज यांचे विविध निमित्तांनी चार दौरे झाले. जालन्यातील सभेलादेखील लोकांनी गर्दी केली होती. तरीदेखील राज यांनी मराठवाड्यातून लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. आले ठाकरेंच्या मना, तेथे कोणाचे चालेना, अशी चर्चा आता राजकीय वतरुळात रंगली आहे. यवतमाळ येथे उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी काही तास बाकी असताना राज ठाकरे यांनी राजेंद्र पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. विमानाने मुंबईहून एबी फॉर्म पाठवण्यात आला. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राज ठाकरे काय निर्णय घेतील, याची शाश्वती नाही.

काय असू शकतील उमेदवार न देण्याची कारणे ?
मनसेकडून 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करून पक्षाने यश मिळवण्याचे ठरवले आहे.
औरंगाबाद आणि मराठवाड्यातील मतदारसंघांत कोणीही मास लीडर पक्षाला दिसून आला नाही. निवडणूक लढवण्यासाठी असलेल्या आर्थिक गणिताचादेखील पक्षाकडून विचार झालेला आहे. पक्षातील बहुतांश पदाधिकारी हे आमदार होण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी स्वत:हून कोणीही पुढे आले नाही.
विधानसभा आणि महानगरपालिका उमेदवारीसाठी आपला मतदारसंघ यानिमित्ताने बांधता येईल, असे स्वप्न पाहणार्‍या स्थानिक नेत्यांचे हे स्वप्न मात्र भंगले आहे.