आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Political Party Leader Coming At Aurangabad After 17 April

औरंगाबादमध्‍ये 17 एप्रिलनंतर होणार मातब्बरांच्या सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रमुख पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर प्रचार कार्याला रंग चढू लागला आहे. राज्यातील निवडणुका 10, 17 आणि 24 एप्रिल अशा तीन टप्प्यांत मतदान होणार असल्यामुळे राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने प्रचार कार्याचे नियोजन केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तिसर्‍या टप्प्यात म्हणजे 24 एप्रिलला मतदान होणार असल्याने विविध पक्षांतील मातब्बर नेत्यांच्या सभा 17 एप्रिल नंतर होण्याची शक्यता आहे. जालना आणि औरंगाबाद मतदारसंघासाठी संयुक्त सभांचे नियोजन करण्यात आले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते क्रिकेट मॅचमध्ये शेवटच्या काही ओव्हरमध्ये सामना निर्णायक ठरतो, त्याचप्रमाणे या सभा जनतेचे मत परिवर्तन करू
शकतात. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील सभा अधिक प्रभावी कशी होईल यासाठी उमेदवार प्रयत्नशील आहेत.
‘आप’चे केजरीवालही येणार
आम आदमी पार्टीची स्थापना झाल्यापासून मराठवाड्यात अरविंद केजरीवाल यांचा अद्याप एकही दौरा झाला नाही. मात्र लोकसभेचे उमेदवार सुभाष लोमटे यांच्या प्रचारासाठी मात्र ते औरंगाबादेत सभा घेण्याची शक्यता आहे. आतापर्यंत देशभरात झालेल्या केजरीवाल यांच्या भाषणाची चर्चा आहे. ते औरंगाबाद येथे काय बोलतील याची उत्सुकता जनतेला आहे. प्रचार सभा व्हावी यासाठी तसे नियोजनही स्थानिक पदाधिकार्‍यांनी केले असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष लोमटे यांनी दिली.
बसपाच्या प्रचारासाठी मायावती
बहुजन समाज पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची सभा होणार आहे. 13 एप्रिल रोजी आमखास मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे बसपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पारधे यांनी सांगितले.
परिवर्तनासाठी अण्णा हजारेंची सभा
आम आदमी पक्षातून बाहेर पडून स्थापन झालेल्या औरंगाबाद परिवर्तन आघाडीच्या प्रचारासाठी अण्णा हजारे यांची 4 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता आमखास मैदानावर जाहीर सभा होणार आहे. बाळासाहेब सराटे हे अण्णा हजारे पुरस्कृत उमेदवार आहेत. औरंगाबाद लोकसभेत बदल घडावा, असे आवाहन या सभेत करण्यात येणार आहे.
मोदींची भारत विजय यात्रा येणार
जम्मू-काश्मीर येथील हिरानगरपासून भारतीय जनात पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भारत विजय यात्रेला प्रारंभ झाला आहे. ही यात्रा 17 ते 22 एप्रिलदरम्यान औरंगाबाद- जालना मतदारसंघात येण्याची शक्यता आहे. शहरात तसे वातवरण निर्माण करणे सुरू आहे. प्रमुख चौकात नरेंद्र मोदी यांचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यासाठी ही सभा होणार आहे. मोंदीच्या सभेच्या तारखेबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यांचा रथ महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतरच तारीख ठरेल.
पाटलांसाठी सोनिया गांधी येणार?
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरून देशातील प्रचाराचा नारळ फोडला होता. आता 17 एप्रिलनंतर नितीन पाटील यांच्या प्रचारासाठी सोनिया गांधी येण्याची शक्यता आहे. जालना आणि औरंगाबाद मतदारसंघासाठी ही सभा संयुक्त असेल. तशी मागणीही स्थानिक पदाधिकार्‍यांकडून करण्यात आली आहे. शिवाय राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते जिल्हानिहाय प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी दिली.