आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Shivsena Party Issue At Aurangabad

शिवसेनेचे सहा पदाधिकारी रडारवर, दानवेंशी वितुष्ट नको म्हणून हटवाहटवीचे सत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेत विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. कन्नडचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीस विरोध करणारे तालुकाप्रमुख आणि जिल्हा परिषदेतील गटनेते डॉ. अण्णा शिंदे यांच्यासह सहा जण कारवाईच्या रडारवर आहेत. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या गंगापूरमधील उमेदवारीत आडकाठी आणू शकणार्‍या दोन जणांचाही यात समावेश आहे. दरम्यान, संभाव्य कारवाई रोखण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ सोमवार किंवा मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे, असे एका पदाधिकार्‍याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

विधानसभेच्या तयारीचा एक भाग म्हणून तीन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. त्या वेळी मनसेमधून शिवसेनेत आलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या संभाव्य उमेदवारीस डॉ. शिंदे यांनी विरोध दश्रवला. त्याची दखल घेण्याचे आश्वासन देण्याऐवजी शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांना पदावरून हटवण्याच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. याशिवाय 15 जुलै रोजी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे गटाच्या कार्यकर्त्यांना गंगापूर-खुलताबाद युवा सेनेचे अधिकारी संतोष माने, मच्छिंद्र देवकर यांनी मारहाण केली. त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. संभाव्य उमेदवारांना विरोध एवढय़ा एकाच निकषावर त्यांची पदे काढून घेण्याचा वरिष्ठांचा विचार आहे. त्यानुसारच जाधव यांना विरोध करणारे उपजिल्हाप्रमुख सुदाम राठोड यांच्यावर कारवाई झाली. दरम्यान, जाधव यांच्या उमेदवारीस विरोध केल्याबद्दल कुणावरही कारवाई करण्याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुळीच विचार नव्हता. शिंदे, राठोड यांचे म्हणणे त्यांनी शांतपणे ऐकूनही घेतले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या बैठकीत काही स्थानिक नेत्यांनी जाधव हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. मुंडेंच्या निधनानंतर दानवेच भाजपचे मराठवाड्यातील सर्वात मोठे नेते आहेत. जागावाटपात महत्त्वाची भूमिका असलेल्या भाजप कोअर कमिटीचे ते सदस्यही आहेत. ते जाधव विरोधकांचा मुद्दा उपस्थित करू शकतात, असे या नेत्यांनी वारंवार मांडल्यावर कारवाईचा निर्णय झाल्याचे शिवसेनेच्या एका पदाधिकार्‍याने सांगितले.

दरम्यान, राठोड यांची पुन:स्थापना करावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी एक शिष्टमंडळ सोमवार किंवा मंगळवारी मुंबईत उद्धव यांना भेटणार आहे. राठोड यांनी आतापर्यंत कधीच पक्षविरोधी कारवाया केल्या नाहीत. लोकसभेत शिवसेनेचा जीव तोडून प्रचार केला, असा मुद्दा त्यांच्यासमोर जोरदारपणे मांडला जाणार आहे, असेही विभागस्तरीय एका पदाधिकार्‍याने सांगितले.

जेजूरकरांवरही गंडांतर : दरम्यान, अंबादास दानवे यांचे निकटवर्तीय मानले गेलेले औरंगाबाद पूर्वचे शहरप्रमुख संतोष जेजूरकर यांच्यावरही गंडांतर आले आहे. त्यांच्या जागी प्रदीप जैस्वाल सर्मथक अनिल पोलकर यांची वर्णी लागणार आहे. पूर्वमधील दहा ते बारा शाखाप्रमुखांनाही पदे सोडण्यास सांगितले जाणार आहे. त्यामुळे शहरातील एका गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. तेदेखील उद्धव यांच्या भेटीसाठी जाण्याच्या तयारीत आहेत.