आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Parties Not To Be, Leaders Private Limited Companies

राजकीय पक्ष नव्हे, नेत्यांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना तसेच भारतीय जनता पक्षामध्ये युती झाली खरी; पण नातेवाईक तसेच जवळच्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने जवळपास सर्वच वाॅर्डांतील निष्ठावंत दुखावले गेले. हे दोन्ही पक्ष राजकीय नसून मोजक्या नेत्यांच्या समान शेअर असलेल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असल्याचा आरोप ज्येष्ठ निष्ठावंतांनी खासगीत बोलताना केला आहे.

११ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. या काळात चित्र बदलू शकते, अशी काहींना अपेक्षा असून त्यानंतर नेत्यांनी पक्षाचे कसे वाटोळे केले, यावर जाहीर भाष्य करण्याची काहींची तयारी आहे. त्यामुळे काही वाॅर्डांत युतीचा उमेदवार विरुद्ध निष्ठावंत पण बंडखोर अशा लढती होणार असून तेथे घराणेशाही कशी चालली आहे, यावर आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत खासदार चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश, पुतण्या सचिन, आमदार संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत, नगरसेवक बन्सीलाल गांगवे यांचा मुलगा मनीष, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले यांच्याबरोबरच त्यांची पत्नी तथा माजी महापौर अनिता, गिरजाराम हाळनोर यांच्या पत्नी सुमित्रा, तर भाजपमध्ये माजी महापौर डॉ. भागवत कराड यांच्या पत्नी अंजली, आमदार नारायण कुचे यांची बहीण गंगाबाई भीमराव भवरे, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी राखी, संजय जोशी यांच्या पत्नी स्वाती अशांना उमेदवारी मिळाली. या सर्व वाॅर्डांत अनेक वर्षांपासून काम करणा-या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले गेले.

नातेवाईक, मर्जीतील कार्यकर्त्यांनाच उमेदवारी
वाॅर्ड आपल्या प्रवर्गानुसार मोकळे झाल्याने वाॅर्डातील कार्यकर्ते गेल्या दीड महिन्यापासून कामाला लागले होते. मात्र, ऐनवेळी दुस-यालाच उमेदवारी देण्यात आल्याने ही मंडळी नाराज झाली. शिवसेनेत खासदार खैरे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपमध्ये स्वत: प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली. काही ठिकाणी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे कार्यकर्तेही अॅडजस्ट केले गेले. त्यामुळे हे पक्ष राजकीय संघटना राहिले नसून वरील मंडळींचे शेअर होल्डिंग असलेल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. तूर्तास ही चर्चा खासगीत होत असली तरी ११ एप्रिलनंतर जेव्हा थेट प्रचार सुरू होईल, तेव्हा त्यावर जाहीरपणे भाष्य होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अशा वाॅर्डांत प्रचाराचे वेगळेच धुमशान दिसेल.