आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींनी एक छदामही दिला नाही- जयदत्त क्षीरसागर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबादच्या एकात्मिक रस्ते विकास योजनेचा खर्च 167 कोटींवरून 427 कोटींवर पोहोचला आहे. शहराच्या विकासाची जबाबदारी शासन आणि लोकप्रतिनिधींचीही आहे. मात्र शहरातील लोकप्रतिनिधींनी यापूर्वी कबूल केलेल्या हिश्श्यापैकी अद्याप छदामही दिला नसल्याची खंत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केली.
एकात्मिक रस्ते विकास योजना 2001 मध्ये औरंगाबादसह 11 शहरांत लागू झाली. औरंगाबादसाठी योजनेत 30 कामांचा समावेश होता. यातील 13 कामे पूर्ण झाली. 5 कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केली. संग्रामनगर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले असून दोन कामे लवकर सुरू होतील. एक काम निविदेवर असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. रस्ते विकास मंडळाने 195 कोटींचे काम केले असून शहरातील लोकप्रतिनिधींनी कबूल केलेला हिस्सा अद्याप दिला नसल्याने विकास कामात मोठा अडथळा येत आहे. शहरातील लोकप्रतिनिधींनी आपला हिस्सा द्यावा, अशी विनंती क्षीरसागर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना केली. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा प्रस्ताव 2001 मध्ये दिला होता. देवळाईच्या बाजूने उतार नसल्याने पूल शक्य नसल्याचा अहवाल रस्ते विकास महामंडळ समितीने वर्ष 2009 मध्ये दिला होता, असे क्षीरसागर म्हणाले. पूल उभारण्याचे काम रद्द झाले, अशी माहिती त्यांनी दिली.
क्रांतीचौक उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महानुभाव आश्रम ते ए. एस. क्लब रस्ता निर्मितीच्या कामास मंजुरी मिळाली असून महिनाभरात काम सुरू करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या निर्मितीमुळे रोज 13 हजार वाहने ये-जा करतील, असेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद ते सोलापूर रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असून औरंगाबाद-धुळे रस्त्याच्या चौपदरीकरणाची निविदा महिनाभरात काढली जाईल. शहरात जालना रस्त्यावरील एसएफएस हायस्कूल व महाराष्ट्र पब्लिक स्कूलसमोर फूट ओव्हर ब्रिज उभारणीस मंजुरीचे आश्वासनही क्षीरसागर यांनी दिले.
क्रांती चौक उड्डाणपुलाला शिवरायांचे नाव देण्याचा प्रस्ताव