आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डावपेच : शिवसेना-भाजपकडून पराभवाची आकडेमोड सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुरुवारी मतमोजणी झाल्यानंतर शुक्रवारी पराभूत झालेल्या उमेदवारांबरोबरच पक्ष पदाधिकाऱ्यांनी कोठे कमी पडलो म्हणून हरलो, यावर कागदावर आकडे घेत मंथन केले. उमेदवारांपेक्षाही त्यांना समर्थन देणाऱ्या नेत्यांनी आकडेमोड केली.
इकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनादेश म्हणून आकडेमोड करण्याच्या फंदात पडण्याचे टाळले. जे मिळाले ते चांगलेच म्हणावे, असे म्हणत काँग्रेस आघाडीचे नेते मोबाइल बंद करून स्वत:च्या उद्योग धंद्यात व्यग्र झाले होते.
उमेदवार तसेच त्यांच्या नेत्यांनी नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी मोठी ताकद लावली होती. त्यासाठी नेत्यांनी रसदही पुरवली होती. मात्र निकालानंतर काहींना अनपेक्षित धक्का बसला. त्यामुळे आपण कोठे कमी पडलो, याचा विचार करत सेना तसेच भाजपचे उमेदवार कार्यकर्ते मंथन करत होते.

मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतदानाच्या याद्या घेऊन ही मंडळी कोणत्या गल्लीत आपल्याला कमी मतदान झाले, कोठे किती मतदान व्हायला हवे होते, कोणत्या गल्लीने दगा दिला, कशामुळे दगा दिला गेला, कोठे कमी पडलो, यावरच हे मंथन सुरू होते.

मिळालेते खूप झाले

अपयशपदरी पडल्यानंतरही काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही. जे मिळाले ते पुरेसे झाले असे म्हणत स्थानिक पदाधिकारी आपापल्या कामाला लागले होते. काँग्रेसला १० जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला एवढ्या जागा अनपेक्षित होत्या. दुसरीकडे राष्ट्रवादीला किमान १० मिळतील, असे अपेक्षित होते. परंतु त्यांना तेवढ्या मिळाल्या नाहीत. तरीही त्यांनी मिळाले ते खूप झाले असे म्हणत ही मंडळी आपल्या कामात व्यस्त झाली.

काँग्रेसची ताकद सर्वत्र

काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार मुस्लिमबहुल परिसरात एमआयएमने बाजी मारली. मात्र जेथे फक्त युतीच विजयी होणार असे सांगितले जात होते तेथेच काँग्रेस राष्ट्रवादीने बाजी मारली आहे, याचा अर्थ काँग्रेसचा बेस हा फक्त मुस्लिम वाॅर्ड नव्हे तर सर्वत्र आहे, असा दावा त्यांनी केला.

३३ थोड्या फरकाने पराभूत

सेनातसेच भाजपचे ३३ उमेदवार थोड्याशा फरकाने पराभूत झाले. त्यात आपण कोठे कमी पडलो हे जाणून घेण्यावर या मंडळींचा भर होता. थोड्याशा फरकाने झालेला हा पराभव विजयात रूपांतरित झाला असता तर आज युतीच्या नगरसेवकांची संख्या सत्तरीच्या पुढे गेली असती. याचा अर्थ युती निर्विवाद बहुमत घेऊ शकते, असे अनेकांचे मत झाले आहे.