आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून ठाकरेंचा ‘अॅक्सिस’ विरोध, पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे रास्ता रोको निदर्शने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अॅक्सिस बँकेत नोकरीला असल्यानेच शासकीय रक्कम त्या बँकेत ठेव म्हणून ठेवण्यात आली, याचा फायदा श्रीमती फडणवीस यांना झाल्याच्या काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार निषेध केला. माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चिकलठाणा येथे सेठ नंदलाल धूत रुग्णालयासमोर सायंकाळी चार वाजता रास्ता रोको तसेच निदर्शने करण्यात आली.

काँग्रेस सरकारनेच केलेले घोटाळे भाजप सरकारच्या माथी मारण्याचे काम विरोधी पक्षाने चालवले आहे. आम्हाला सत्तेत येऊन अवघे एकच वर्ष झाले तरीही दहा वर्षे झाल्यासारखी काँग्रेसजनांची अवस्था झाली आहे. अॅक्सिस बँकेत शासनाची रक्कम ठेवावी, हा निर्णय २०१२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारनेच घेतला होता. त्यानुसार या वेळी ही कारवाई झाली. तेव्हा खासगी बँकेत पैसे ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या मंत्र्यानेच गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनात नगरसेवक गोकुळसिंग मलके, माजी नगरसेवक गणेश दहिहंडे, युवराज भालेराव, गोरख दहिहंडे, शिवा लष्करे, शंकर पवार, शेख मतोद्दीन आदी सहभागी झाले होते.

अॅक्सिससारख्या खासगी बँकांत शासकीय ठेव ठेवण्याचा निर्णय ज्यांनी घेतला त्यांनाच याचा जाब विचारायला हवा. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी उच्चपदस्थ आहेत. केवळ ठेव ठेवली म्हणून त्यांना पदोन्नती दिली जाईल, असे म्हणणे हास्यास्पद आहे. ठाकरे यांनी आरोप करताना भान ठेवले पाहिजे. त्यांनीच गैरव्यवहार केला आणि आता सत्ता परिवर्तन झाले म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही. याला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते योग्य पद्धतीने उत्तर देतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला.