आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपसातील राजकीय वादात शिवसैनिकांच्या पुढे ‘युवा सैनिक’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहर जिल्ह्याच्या शिवसेनेतील गट-तट, आपसातील वाद, लाथाळ्या शिवसैनिकांना नव्या नाहीत. युवा सेना गठित करत आदित्य ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश करून तरुणांचा सेल निर्माण केला. यासाठी जिल्हा तसेच तालुका पातळीवर युवा अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. मात्र अंतर्गत वादात हे युवा सैनिक केव्हाच बुजुर्ग शिवसैनिकांच्या पुढे गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच या नियुक्त्या रखडल्या असून नव्या नियुक्त्यांसाठी जोरदार संघर्ष सुरू आहे.
जिल्हा तसेच शहरातील मतदारसंघनिहाय युवा अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यापासूनच वाद समोर येत होते. खैरे विरोधी गटाने आधीपासूनच ही कार्यकारिणी बरखास्त करण्यासाठी प्रयत्न चालवले होते. अखेर सहा महिन्यांपूर्वी त्या गटाला यश आले अन् शहर युवा अधिकाऱ्यांना स्थगिती देण्यात आली. जिल्हा युवा अधिकारी (शहर) ऋषिकेश खैरे, पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे युवा अधिकारी किरण तुपे, पूर्वचे सतीश पवार मध्यचे मिथुन व्यास यांना काम करण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे हे चौघेही अस्वस्थ होते. कारण ग्रामीणचे जिल्हा युवा अध्यक्ष संतोष माने तालुक्यातील युवा अधिकाऱ्यांना मात्र तशी स्थगिती देण्यात आली नव्हती.

लवकर नवीन कार्यकारिणी जाहीर होईल, असे वेळोवेळी सांगण्यात येत होते. त्यासाठी एक महिन्यापूर्वी युवा सेनेच्या कोअर कमिटीच्या सदस्यांनी इच्छुकांच्या रीतसर मुलाखतीही घेतल्या होत्या. तरीही कार्यकारिणी जाहीर झाली नाही किंवा स्थगितीही उठवण्यात आली नाही. त्यातच मंगळवारी ऐनवेळी पुन्हा मुलाखती घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी कोअर कमिटीचे सदस्य सुभेदारी विश्रामगृहावर दाखल झाले होते. एक महिन्यापूर्वीच मुलाखती झाल्या, त्यावर निर्णय घ्यायच्या ऐवजी पुन्हा मुलाखती कशासाठी, असा आक्षेप एका गटाने घेतला. यावरून दोन गटांत चांगलीच वादावादी झाल्याचे कळते.

युवा अधिकाऱ्यांतील राजकारण वाढत असल्याचे दिसताच मुंबईच्या कोअर कमिटीने काढता पाय घेण्याचे ठरवले अन् नंतर मुलाखती नव्हे तर आढावा बैठक असल्याचे सांगून वेळ मारून नेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरातील युवा अधिकाऱ्यांचे वाद केवळ आदित्य ठाकरेच नव्हे तर मातोश्रीवर थेट उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत हे युवा अधिकारी त्यांच्या नातेवाइकांनी पोहोचते केल्याचे समजते. युवा अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या तेव्हाच युवा अधिकाऱ्यांच्या नावे पक्षात घराणेशाही आल्याची टीका झाली होती. कारण युवा अधिकारी हे आमदार, खासदार यांचे पुत्र, भाऊ अन्य नातेवाईक असेच होते. युवा अधिकाऱ्यांच्या या कार्यकारिणीवर खासदार चंद्रकांत खैरे यांचाच पगडा होता. मंगळवारी मुलाखतीऐवजी ऐनवेळी आढावा बैठक झाल्यानंतर कार्यकर्त्यांना नियुक्त्या कधी असा सवाल यावेळी उपस्थित केला. तेव्हा या नियुक्त्या मुखपत्रातून आठ दिवसांत जाहीर होतील, असे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नियुक्त्या करून घेण्यासाठी इच्छुक युवा शिवसैनिकांनी मागील आठवड्यातच मुंबईवारी केली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर दुसऱ्या गटानेही प्रतिशह देण्यासाठी मुंबई गाठून युवा नेत्याची भेट घेतली. त्यामुळे नियुक्त्या लवकर होण्याऐवजी लांबणीवर टाकण्याचे वरिष्ठ नेत्यांनी ठरवल्याचे समजते.

स्थगित कार्यकारिणीचे पदाधिकारी
- ऋषिकेश खैरे,जिल्हायुवा अधिकारी (शहर)
- किरण तुपे(युवाअधिकारी, पश्चिम विधानसभा मतदारसंघ)
- सतीश पवार (युवाअधिकारी, पूर्व)
- मिथुन व्यास(युवाअधिकारी, मध्य)
(यातील व्यास हे पक्षातून बाहेर पडल्यासारखे आहेत. त्यांच्या भावाने पालिका निवडणुकीत बंडखोरी केली होती. वरील उर्वरित तिघेही पुन्हा पदावर बसण्यास इच्छुक असून त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.)

इथेही खैरे-जैस्वाल गट
युवापदाधिकाऱ्यांचा आक्रमक अवतार बघितल्यानंतर आपल्या पदाधिकाऱ्यांना आपसात हाणामारी करू नये, असे कोअर कमिटीच्या सदस्यांनी सुचवले. हाणामारी झालेली नसतानाही त्यांनी सूचना करावी, याचा अर्थ युवा पदाधिकाऱ्यांमधील वाद कधीही त्या टोकापर्यंत जाऊ शकतो, याचा अंदाज युवा नेत्यांना आला असण्याची शक्यता आहे. वरिष्ठांप्रमाणेच युवा अधिकाऱ्यांमध्येही खासदार खैरे माजी आमदार प्रदीप जैस्वाल गट असल्याचे बोलले जाते.