आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politics News In Marathi, Interested Candidate For Loksabha In Jalna, Divyamarathi

जालना लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारीसाठी सरसावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चुरस
काँग्रेसकडून आतापासून जोरदार मोर्चेबांधणी, भाजप चौथ्यांदा विजय मिळवण्याच्या तयारीत, इच्छुकांचे वरिष्ठांच्या आदेशाकडे लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी लोकसभेची जागा मिळवण्यासाठी सरसावली आहे. भाजपनेही नरेंद्र मोदींच्या हुकमी मोहर्‍यावर खासदारकी कायम राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. बहुतांश सर्वच प्रमुख पक्षांकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
जालना मतदारसंघात सिल्लोड-सोयगाव, भोकरदन, जालना, बदनापूर, पैठण व फुलंब्री असे सहा मतदारसंघ येतात. या सहा मतदारसंघात काँग्रेसकडे फुलंब्री, सिल्लोड-सोयगाव व जालना हे तीन मतदारसंघ आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे भोकरदन व पैठण हे मतदारसंघ आहेत. शिवसेनेकडे केवळ बदनापूर हा राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात जरी काँग्रेसचे आमदार असले, तरी गेल्या 15 वर्षांपासून खासदार असलेले रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून भाजपने विजय संपादन केला आहे. गेल्या वेळेस खासदार दानवे यांच्या विरोधात (कै.) विलासराव देशमुख यांच्या सांगण्यावरून फुलंब्रीचे आमदार डॉ. कल्याण काळे यांनी चांगली लढत दिली होती. जवळपास फुलंब्री सोडता सर्वच विधानसभा मतदारसंघांत रावसाहेब दानवे यांची पीछेहाट झाली होती. फुलंब्री तालुक्यामुळेच दानवे यांचा केवळ 8 हजार मतांनी विजय झाला होता. मात्र, लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. कल्याण काळे यांनी आपला ढासळलेला गड शाबूत ठेवून फुलंब्री विधानसभेवर दुसर्‍यांदा विजय मिळवला होता. या वेळेस आमदार अब्दुल सत्तार (सिल्लोड), कैलास गोरट्यांल (जालना), चंद्रकांत दानवे (भोकरदन), डॉ. कल्याण काळे ( फुलंब्री), संजय वाघचौरे (पैठण), हेच पाच आमदार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, तर शिवसेनेकडे बदनापूरची आमदार संतोष सांबरे यांच्या रूपाने एक जागा आहे.
एकदंरीत राजकीय कल पाहता फुलंब्री, सिल्लोड, औरंगाबादच्या पंचायत समिती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत, तर सिल्लोड व भोकरदन या नगरपालिकाही काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला होऊ शकतो. या उलट खासदार रावसाहेब दानवे यांच्या पाठीमागे नरेंद्र मोदी हाच महत्त्वाचा फॅक्टर आहे. या फॅक्टरवर खासदार दानवे चौथ्यांदा लोकसभेत पोहोचू शकतात. औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष विलास औताडे यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. त्यात अधूनमधून फुलंब्रीचे आमदार डॉ. कल्याण काळे यांचेही नाव घेतले जाते. तसे पाहिले तर काळे यांचे नाव औरंगाबाद व जालन्यासाठी घेतले जात आहे. मात्र, आमदार काळे यांनीच मी खासदारकी लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगत आहे अप्रत्यक्षरीत्या विलास औताडे यांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे महत्त्व आता वाढू लागले आहे. त्यांना आता विलासराव देशमुखांचे सर्मथकसुद्धा मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे. सध्या चव्हाण यांचा गट मराठवाड्यात सक्रिय झाला आहे. आमदार अब्दुल सत्तार, कैलास गोरंट्याल, कल्याण काळे यांनीच विलास औताडे यांचे नाव पक्षर्शेष्ठींकडे सुचवल्यामुळे उमेदवारीच्या आखाड्यात विलास औताडेंचे महत्त्व वाढले आहे. एकदंरीत नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समित्या, जिल्हा परिषद व सर्व सहकारी संस्था सध्या काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळे काँग्रेस उमेदवारासाठी जालना लोकसभा मतदारसंघ दिवसेंदिवस प्रबळ बनत चालला आहे.