आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politics News In Marathi, Tug Of War Continues., Uttam Sing Pawar's And Nitin Patil Supporters Fight , Divyamarathi

उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी केला गांधी भवनाचा आखाडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्सीखेच सुरू । उत्तमसिंह पवार, नितीन पाटील सर्मथकांमध्ये तुंबळ हाणामारी
औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीवरून शनिवारी माजी खासदार उत्तमसिंह पवार आणि माजी आमदार नितीन पाटील यांच्या सर्मथकांनी तुंबळ हाणामारी करून शहागंज येथील गांधी भवनाला आखाडा बनवला. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. हा प्रकार पाहून निरीक्षकांनी स्वत:ला बंद खोलीत कोंडून घेतले. शेवटी पोलिस बंदोबस्तात उमेदवारांच्या मुलाखती उरकण्यात आल्या.
लोकसभा उमेदवाराच्या चाचपणीसाठी आलेल्या दोन पक्षनिरीक्षकांसमोर इच्छुक उमेदवार माजी खासदार उत्तमसिंह पवार आणि कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांचे सर्मथक समोरासमोर आले. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. माइक तोडले आणि नंतर निरीक्षकांच्या उपस्थितीत प्रयत्न केला. सकाळी 11 ते दीड वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. उमेदवार जाहीर होईपर्यंत यापुढे गांधी भवनात कोणतीही बैठक किंवा सभा घेतली जाणार नाही, असे निरीक्षक मुजफ्फर हुसेन यांनी खासगीत बोलताना सांगितले.
शुक्रवारची पार्श्वभूमी
शुक्रवारी सायंकाळी निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उत्तमसिंह पवार यांच्या सर्मथकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. तेव्हा नितीन पाटील यांचे फारसे सर्मथक उपस्थित नव्हते.
अशी झाली सुरुवात
सकाळी ठीक 11 वाजता गंगापूर, वैजापूर, कन्नड या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी निरीक्षक गांधी भवनात दाखल झाले. पवार यांच्यापेक्षा माझ्या पाठीशी जास्त कार्यकर्ते आहेत, हे दाखवण्यासाठी पाटील यांचे कार्यकर्ते हातात फलक घेऊन गांधी भवनात दाखल झाले. त्यांच्याकडून नितीन पाटील झिंदाबादच्या घोषणा सुरू होत्या. त्यात पवार सर्मथक कार्यकर्ता घोषणा देऊ नका, असे म्हणत होता. मात्र, घोषणा वाढल्याने पुढे हातघाईला सुरुवात झाली.
पाटील काय बोलले माहिती आहे?
पाटील सर्मथकांच्या घोषणा वाढताच माइक हाती असलेल्या कार्यकर्त्याला राहवले नाही. तो म्हणाला, पाटील यांच्या घोषणा तुम्ही देताय;पण हेच पाटील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कन्नड येथे काय बोलले माहिती आहे काय? ते म्हणाले होते, कन्नडच्या काँग्रेस उमेदवाराला मीच पाडले अन् हर्षवर्धन जाधव विजयी झाले. अशा उमेदवाराची तरफदारी तुम्ही करणार का? तो कार्यकर्ता त्याचे म्हणणेही पूर्ण करू शकला नाही. त्याआधीच त्याला ताब्यात घेत बेदम चोप दिला.
अर्धा तास फक्त घोषणाबाजी
दोन्हीही सर्मथक अर्धा तास घोषणाबाजी करत होते. त्यामुळे बंद दालनात जनमत जाणून घेणारे निरीक्षक पुन्हा सभागृहात आले. कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी 20 मिनिटे गेली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी या प्रकाराची निंदा केली. मुजफ्फर हुसेन बोलण्यास उभे राहताच त्यांच्या हातातील माइक तोडण्यात आला आणि गोंधळाला सुरुवात झाली. एकमेकांचा पाठलाग करत ही मंडळी रस्त्यावर आली. इकडे काँग्रेसचे कार्यकर्ते गांधी भवनातून गेल्याचे बघून निरीक्षक पुन्हा बंद दालनात जाऊन बसले. तोपर्यंत पोलिस पोहोचले होते. त्यांनी लाठीहल्ला करून कार्यकर्ते पांगवले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात निरीक्षकांनी मुलाखती घेतल्या.
हाताची घडी
मिलिंद पाटील व जे. के. जाधव हे अन्य तुल्यबळ इच्छुक. शुक्रवारी रात्री जाधव यांना गांधी भवनाबाहेर काढण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सकाळी ते येथे आले नि काहीही न बोलता गेले. मिलिंद पाटील मात्र ठाण मांडून होते. आधीची हाणामारी, नंतरची चकमक बघितल्यानंतर त्यांनी हाताची घडी मारून बसणे पसंत केले.