आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिशात हात घालून राजकारण करू नका - राजेश टोपे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाजगाव - हातात हात घालून विकास करा, खिशात हात घालून राजकारण करू नका, असा टोला राज्याचे उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी गंगापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.


अंबेलोहळ येथे आमदार प्रशांत बंब यांच्या निधीतून बांधल्या जाणा-या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन, एस. बी. पब्लिक स्कूल आणि एव्हरग्रीन इंग्लिश स्कूलचे उद्घाटन टोपे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार प्रशांत बंब, आमदार संजय वाघचौरे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, कृष्णा पाटील डोणगावकर, दिलीप बनकर, हाशम पटेल, गणेश अंकुश, प्रदेशाध्यक्ष शिवाजी बनकर यांची उपस्थिती होती.
या वेळी टोपे म्हणाले की, गंगापूर तालुका दुष्काळाने होरपळून निघाला आहे. शेतक-याला निसर्गाने मोठ्या पेचात टाकले आहे. या ठिकाणी दूध उत्पादक संस्था आहेत. दुधाचा व्यवसाय वाढवावा, त्याचा सर्व कुटुंबाला फायदा होईल. स्थानिक पुढा-यांचा समाचार घेताना ते म्हणाले की, आपण आपसात राजकारण करू नका, जवळच वाळूज एमआयडीसी आहे. रस्ता दुरुस्तीसाठी सरकारकडे मागणी करण्यापेक्षा मोठ्या कंपनीच्या मालकांची मदत घेऊन रस्ते दुरुस्ती करा. हातात हात घालून विकास करा, असा सल्लाही त्यांनी दिला.


या वेळी आमदार प्रशांत बंब यांनी लासूर स्टेशन येथे आयटीआय कॉलेज द्यावे, अशी मागणी केली. तर प्रदेशाध्यक्ष शिवाजी बनकर यांनी अंबेलोहळ येथे उर्दू शाळेची मागणी केली. याशिवाय भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीस दोन महिन्यांची मुदत द्या, नसता दिवसभरात एक तास तरी लाइट द्या, अशी मागणी शेतक-यांच्या वतीने केली.