आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर-जळगाव रेल्वे मार्गावरून राजकारण सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सोलापूर ते जळगाव नवीन मार्गावरून शिवसेना - भाजप असे राजकारण चांगलेच पेटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे पैठणमार्गे जळगाव हा रूट बदलून जालना, अजिंठा जळगाव नवीन रूट सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत. यामुळे पैठण, औरंगाबाद, वेरूळचे लोक, लोकप्रतिनिधी कमालीचे संताप व्यक्त करत आहेत. याच मुद्यावरून सुभेदारी सभागृहात जालना आणि औरंगाबादेतील नागरिकांची बाचाबाची झाली होती. पैठणमध्ये बंद पुकारला होता. शुक्रवारी जुलै रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात खा. चंद्रकांत खैरे यांनी पैठण मार्गात कोण बदल करतो ते मी बघतो, असा इशाराच देऊन टाकला आहे.
सोलापूर ते जळगाव नवीन रेल्वे मार्ग पैठण,औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा, जळगाव असा घोषित केला होता. पण राजकीय मतभेदांमुळे सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, जालना, भोकरदन, अजिंठामार्गे जळगाव असा बदल करण्यात आल्याची जोरदार वावडी उठली आहे. दानवे यांच्या राजकीय शक्तीमुळे हा बदल केल्याची चर्चा आहे. औरंगाबादचे नेतृत्व कमी पडत असल्याने पर्यटन नगरीला डावलण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नागरिकांनी नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे खैरेही अस्वस्थ झाले आहेत. जालना -औरंगाबाद अशा नव्या वादाला तोंड फुटले आहे. हा संघर्ष कायमचा मिटावा, यासाठी खैरे यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणेच सोलापूर - जळगाव नवीन रेल्वे मार्ग करण्यात यावा. कुणाच्याही सांगण्यावरून यामध्ये कोणताही बदल करू नये, अशी आग्रही भूमिका मांडली.
रेल्वेमंत्र्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट सादर
सोलापूर, तुळजापूर, गेवराई, पैठण, औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा जळगाव हा मार्ग निश्चित करावा यासाठी या मार्गाचा प्रोजेक्ट रिपोर्ट पैठणच्या शिष्टमंडळाने खा. खैरे यांच्या नेतृत्वात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना सादर केला. त्यात म्हटले आहे की, ४० वर्षांपूर्वीची ही मागणी आहे. या मार्गामुळे तुळजापूरची तुळजा भवानी, अापेगावचे संत ज्ञानेश्वर, पैठण येथील संत एकनाथ महाराज, वेरूळचे श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माचा प्राचीन इतिहास सांगणारी जगातील एकमेव वेरूळ अजिंठा लेणी जोडली जाणार आहे. बिडकीन डीएमआयसीलाही याचा फायदा होणार आहे. आर्थिकदृष्ट्या परवडणारा असल्यामुळे हा मार्ग तातडीने पूर्ण व्हावा, यासाठी पैठण रेल्वे संघर्ष दलाने वेळोवेळी आंदोलने केली आहेत. काही दिवसांपासून यात राजकीय हस्तक्षेप वाढला असून मार्ग बदलण्याचा घाट घातला जात आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संतोष तांबे, दलाचे अध्यक्ष गणेश मडके, सचिव प्रा. संतोष गव्हाणे, सुभाष काळे, नितीन देशमुख, दिनेश पारिख, गणेश औटे, चंद्रकांत अंबिलवादे, एकनाथ काळे, नानक बेरी, बाळू आहेर, गणपतराव म्हस्के आदींनी दिला आहे.
खरे काय ते सांगून टाका
सोलापूर- जळगाव मार्गावरून दररोज उलटसुलट चर्चा रंगत आहे. यापेक्षा रेल्वे प्रशासनाने मार्ग कसा होणार हे स्पष्ट करावे, अशी सूचना फुलंब्रीचे आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाचा विकास करावा, औरंगाबाद - मुंबई रेल्वे मार्गावर दुहेरी लाइन टाकण्याची मागणीही त्यांनी केली.
जालना- खामगाव, जालना - जळगाव रेल्वे सुरू करा
जालना- खामगाव रेल्वे सुरू करण्याची मागणी १९२९ पासून होत आहे. याकडे प्रभूंनी दुर्लक्ष करता त्वरित काम सुरू करावे. तसेच सोलापूर जालना जळगाव या प्रलंबित मार्गाला मंजुरी द्यावी, जनशताब्दी एक्स्प्रेस जालना येथून सोडावी, स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या नावे संशोधन केंद्र निर्माण करावे, अनधिकृत हॉकर्सची हकालपट्टी करावी या मागण्यांसाठी जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने गणेशलाल चौधरी, फेरोज अली, सुभाषचंद्र देविदान, अॅड. विनायक चिटणीस, राधेश्याम जैस्वाल, विष्णू पाचफुले, शीतल तनपुरे आदींनी निवेदन दिले.