आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीच्या ‘उद्योगा’मुळे औरंगाबादेतील पाणी दूषित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसीने 30 वर्षांपूर्वी 1982 मध्ये नाथसागराच्या सुरक्षा भिंतीपासून 22 किलोमीटर अंतरावरील ब्रह्मगव्हाण उपसा केंद्रातून पाणीपुरवठा योजना चालू केली. त्यातून वाळूज, चिकलठाणा, जालना, औरंगाबाद रेल्वेस्टेशन या औद्योगिक वसाहतींना तसेच या औद्योगिक वसाहतींमधील वसाहती, बजाजनगर वसाहत आणि 11 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. रेल्वेस्टेशन एमआयडीसी कर्मचारी वसाहतीत 2 वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. कॉलरा, टायफॉइड, कावीळ, गॅस्ट्रो आदी आजारांनी लोक त्रस्त आहेत. पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे वैतागलेल्या लोकांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली. दरम्यान एका जागरूक नागरिकाने हे पाणी तपासून घेतले तेव्हा त्यात क्लोरोफॉर्मचे प्रमाण जास्त (16), तर थरमोटॉलरंट जीवाणूंचे प्रमाणही जास्त (6) आढळले. डीबी स्टार तपास करत असल्याचे कळताच एमआयडीसी पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी लगेच चाचणी करून पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल मिळवला. एकाच योजनेच्या पाण्याचे दोन वेगळे अहवाल आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

उपसा केंद्राला घाणीचा विळखा
ज्या ब्रह्मगव्हाण उपसा केंद्रातून पाणीपुरवठा होतो ते केंद्रच घाणीच्या विळख्यात आहे. या ठिकाणी खाम नदी, पैठण व औरंगाबाद शहरातील ड्रेनेजचे पाणी जात आहे. शिवाय गाळ, शेवाळ साचून येथील पाणी आणखी दूषित होते.

गंजलेल्या जलवाहिन्या
हेच दूषित पाणी गंजलेल्या जलवाहिनीतून 65 किमी अंतरावर वाळूज जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचते. वाटेत अनेक गावांचे सांडपाणी, साचलेली घाणीची डबकी, कचर्‍याची ढिगारे यातून मार्ग काढत येते. त्यात ग्रामस्थांनीही वाटेत ठिकठिकाणी जलवाहिनीला पाडलेल्या भगदाडांमुळे पाण्यात आणखी घाण पडते व तेच पुढे वाळूजला जाते.

वाळूजचे जलशुद्धीकरणही खराब
वाळूजच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 72 हजार एमएलडी पाणी शुद्ध करण्याइतकी आहे. त्यात सहा फिल्टर आहेत. तेही अकार्यक्षम आहेत. त्यामुळे अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया होत नाही. केंद्रातून वितरित करण्यात येणार्‍या या पाण्यात गाळ, शेवाळ आणि मैलायुक्त घाणीचे प्रमाण तसेच राहते.

जुन्या झालेल्या जलवाहिन्या
जलशुद्धीकरणास 700 मिमी व्यासाच्या तीन जलवाहिन्या जोडल्या आहेत. त्यातून वाळूज एमआयडीसी, रांजणगाव जुळे जलकुंभ, चिकलठाणा पंपिंग सेंटरला पाणीपुरवठा होतो. जलकुंभात पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला सतत भगदाड पाडण्याचे काम चालू असते. दुसर्‍या जलवाहिनीतून वाळूज ते जीएसआर लेव्हलच्या कंपन्यांना व उर्वरित बजाजनगरला पाणीपुरवठा होतो. तिसरी पाइपलाइन 30 किमीवरील चिकलठाणा पंपिंग सेंटरला पाणी पुरवते. याच पाइपलाइनमधून रेल्वेस्टेशन एमआयडीसीत पाणीपुरवठा केला जातो. या सर्व जलवाहिन्या माइल्ड स्टीलमध्ये बनवलेल्या आहेत. त्यांची वयोर्मयादा संपल्याने त्या जागोजागी गंजलेल्या आहेत.

थेट सवाल- राजेंद्र नवाळे,
कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग), एमआयडीसी

एमआयडीसीचे पाणी दूषित आहे..
- यंत्रणाच जुनाट झाल्याने तक्रारी वाढल्या आहेत. उन्हाळ्यात त्यात आणखी भर पडते.
दूषित पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार ?
-पीएसी (पॉली अँल्युमिनियम क्लोराइड) यंत्रणेद्वारे गढूळपणा कमी करतो. त्यानंतर जलशुद्धीकरणात पोहोचवतो. निर्जंतुकीकरण करण्यासाठी एलसीजी (लिक्विड क्लोरीन गॅस) वापरतो, मात्र, याची पॉवर फक्त 24 तास राहते. जलसाठा जर 24 तासांपेक्षा जास्त काळ शिल्लक राहिला तर पाण्यात पुन्हा जंतू तयार होतात. ही समस्या सोडवण्यासाठी दोन वर्षांपासून पुण्यातील जलतज्ज्ञांचे पथक आम्ही बोलावतो. बेंटोनाइट सँड अर्थात मुलतानी माती व अल्गीसाइट ही शेवाळ नष्ट करणारी प्रक्रिया राबवतो. या ट्रीटमेंटसाठी प्रतिमहा 10 लाख रुपये खर्च केला जातो.
जलवाहिन्या वारंवार फुटतात, तुमचे लक्ष नसल्याचा आरोप आहे..
-वाळूजची जीएसआर लाइन डीआयमध्ये (डक्टाइल आयर्न) टाकण्यासाठी दोन वर्षांपूर्वी जवळपास 1 कोटी रुपये खर्च केला. पुढे वाळूज ते रांजणगाव जुळे जलकुंभ ही लाइन बदलण्याचे काम चालू आहे. यासाठी 20 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
नव्याने उभारत असलेल्या डीएमआयसीचे (दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर) काय ?
30 कोटी रुपये खर्चून शेंद्रा टप्पा क्रमांक 2 व जालना टप्पा क्रमांक 3 यासाठी नाथसागराच्या भिंतीजवळ उपसा केंद्र करीत आहोत. कचनेरजवळ जलशुद्धीकरण करून तेथे हे पाणी आणणार. त्यातून शेंद्रा व डीएमआयसीईला पाणी पुरवणार.

तिन्ही जलवाहिन्यांचा मार्गही घाणीचा
या तिन्ही जलवाहिन्यांना जागोजागी भगदाडे पडली आहेत. शिवाय त्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गांवरही घाणच घाण आहे. अनेक ठिकाणी त्या नाल्यांमधून जातात. काही ठिकाणी रासायनिक कंपन्यांच्या उघड्यावर सोडलेल्या दूषित पाण्यातून जातात. जागोजागी भगदाडे पडल्याने त्यात हे घाण पाणी शिरते. हेच घाण पाणी नळावाटे मग एमआयडीसी व वसाहतींपर्यंत लोकांच्या घरात पोहोचते.

कुठलीही अद्ययावत प्रयोगशाळा नाही
पाण्यावर किमान 400 चाचण्या आवश्यक असतात. पैकी पिण्यायोग्य पाण्याच्या 15 चाचण्या आवश्यक आहेत. यासाठी या विभागाला दरमहा महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पायर्‍या झिजवाव्या लागतात.मात्र, अहवाल येण्यास उशीर लागतो. यासाठी या विभागाकडे अद्ययावत जलचाचणी प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे. केवळ बॅक्ट्रोलॉजिकल आणि केमिकल टेस्ट विभागामार्फत घेण्यात येतात.

जलकुंभही अस्वच्छ
30 वर्षांपूर्वी वाळूज परिसरात 18 लाख लिटरचे 3, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत साडेतेरा लाख लिटरचे 2, रेल्वेस्टेशन एमआयडीसीत अडीच लाख लिटरचा 1 असे एकूण 6 जलकुंभ उभारण्यात आले होते. त्यांची निगा राखली जात नाही. वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने त्यात भयंकर घाण साठली आहे.