आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाजिर हो! दूषित पाण्याबाबत कोर्टात म्हणणे मांडा; 15 ऑक्टोबरला उपस्थितीचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शुद्ध पाणीपुरवठा करण्यास असर्मथ ठरलेल्या मनपाच्या आजी-माजी आयुक्तांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी 15 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. टी. जोशी यांनी दिले.

शुद्ध पाणीपुरवठय़ासंबंधी न्यायालयाने निर्देश दिले असतानाही पालिकेने अशुद्ध पुरवठा केला. याविरोधात अँड. प्रदीप देशमुख यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. याचिकेत तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना प्रतिवादी करण्यात आले. न्यायालयाने प्रथम प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर डॉ. भापकर यांनी शपथपत्र दाखल करून मनपाच्या कृतीचे सर्मथन केले होते. शपथपत्र समाधानकारक नसल्याने व शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे खंडपीठाने तीनसदस्यीय समितीची नियुक्ती केली. समितीने नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेत शहरातील सर्व भागांतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. दरम्यान, काही पाण्याच्या टाक्यांचेही निरीक्षण केले. खंडपीठाने महापालिका, याचिकाकर्ते आणि तज्ज्ञ समिती यांच्या शपथपत्राची नोंद घेऊन विद्यमान आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, तत्कालीन आयुक्त पुरुषोत्तम भापकर आणि प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांना अवमान केल्याबद्दल नोटीस बजावण्याचे आदेश दिले. या प्रकरणात अँड. देशमुख यांना अँड. ऋषीकेश जोशी यांनी साहाय्य केले. मनपातर्फे अँड. नंदकुमार खंदारे, तर शासनाकडून अँड. विठ्ठल दिघे यांनी काम पाहिले.

वर्षाला 40 कोटींचा खर्च
कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे म्हणाले, शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर वर्षाला साधारणपणे 40 कोटी रुपयांचा खर्च होतो. शुद्ध पाणी मिळावे म्हणून ठिकठिकाणी पाण्याचे रोज नमुने घेऊन पाण्याच्या शुद्धतेची चाचणीही घेतली जाते. त्यानुसार औषधींचा वापर केला जातो.

ड्रेनेज, पाणी एकत्रच
40 ते 50 टक्के शहर हे जुने आहे. तेथे पाणी आणि ड्रेनेजच्या लाइन एकत्रच गेलेल्या आहेत. अनेक भागांत तर त्या जुन्याही झाल्या आहेत.

कोठे होते पाणी दूषित
जलकुंभापर्यंत शुद्ध पाणी असते. पण सडलेले नळ, जुन्या कनेक्शनमधून दूषित पाण्याचा शिरकाव, ड्रेनेजजवळील पाण्याच्या लाइनमुळे पाणी दूषित होते.