आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपरफुटीची गुंतागुंत वाढली; कोडे उलगडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पॉलिटेक्निक पेपरफुटी प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे होत असून तंत्रशिक्षण मंडळ आणि अटकेतील कर्मचार्‍यांचे जबाब यात तफावत दिसून येत आहे. कंत्राटी कामगार सागर बावत याने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेपरचे तीन गठ्ठे जाळण्यात आले, पण तंत्रशिक्षण मंडळात मात्र पेपरचा एकच गठ्ठा गायब असल्याची नोंद आहे. दुसरीकडे अटकेतील प्रकल्प सहायक राजेंद्र पुरी याने वरिष्ठांची परवानगी न घेता पेपरचा एक गठ्ठा संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयाला पाठवल्याचे म्हटले. त्यामुळे या प्रकरणाचे कोडे उलगडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सागरच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी सोमवारी राहुल मकासरे याला अटक केली. फुटलेल्या गठ्ठय़ातून एक पेपर काढत त्याच्या झेरॉक्स प्रती करून विकल्याचे सागरने प्रथम पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर तीन गठ्ठे जाळल्याचे तो म्हणाला, परंतु पोलिसांना मात्र याचा पुरावा सापडला नाही. पॉलिटेक्निकच्या पेपरचे संच एकूण 25 महाविद्यालयांना वाटप करण्यात आले. पुरीने वरिष्ठांची परवानगी न घेता मॅथ-1 च्या 17104 क्रमांकाचा एक गठ्ठा संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयाला पाठवला, पण याच गठ्ठय़ासोबतचे आणखी दोन गठ्ठे गायब असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले.संगमनेरच्या प्राध्यापकांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक आसाराम शेटे यांनी सांगितले. बावतसोबतच्या सर्व कंत्राटी कामगारांचेदेखील जबाब नोंदवले जाणार असल्याचे ते म्हणाले.