आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिथीन नव्हे, धोक्याची पिशवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कुठल्याही दुकानात आपण सामानासाठी कॅरीबॅग मागत असाल तर सावधान! पॉलिथीनची ही पिशवी आपल्यासाठीच नव्हे, तर आपल्या मुलांसाठी तसेच येणार्‍या कित्येक पिढय़ांसाठी धोक्याची ठरू शकते. ही कॅरीबॅग किमान एक हजार वर्षे विघटित होत नाही. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होतोच, शिवाय भूगर्भातील पाण्याचे झरेही अडवले जातात. मुंबईत 2005 मध्ये मिठी नदीला आलेल्या पुरासही कॅरीबॅगच कारणीभूत ठरल्या होत्या. कॅरीबॅग गिळल्यामुळे समुद्र, नदी व इतर जलाशयातील जीवांना आणि जनावरांनाही धोका निर्माण होतो. ती जाळली तर हवाही दूषित होते. त्यामुळे 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगला घरात प्रवेशबंदी घाला तरच तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहील.
पिशव्यांचा धोका थेट तुमच्या मुलांना कसा होऊ शकतो असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. अनेकदा पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थ टाकून त्या कचराकुंडीत फेकल्या जातात.

खाद्यपदार्थांमुळे गायी, म्हशी, बकर्‍या, कुत्रे या पिशव्यांसह हे अन्न खातात. या कॅरीबॅग गायीच्या पोटात महिनोन्महिने जमा होत राहतात. (संसर्ग होऊन गायीचा मृत्यू होऊ शकतो.) या गायींच्या दुधामुळे कॅन्सर व क्षयरोगाचा धोका असतो. उत्तर प्रदेशच्या पशुसंवर्धन विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. या राज्यात कॅरीबॅगमुळे रोज किमान 70 ते 80 गायींचा मृत्यू होतो. शिवाय एवढय़ाच गायींवर शस्त्रक्रिया करून पोटात जमा झालेले पॉलिथीन बाहेर काढले जाते. एकेका गायीच्या पोटातून 30-35 किलो प्लास्टिक निघाले आहे. प्लास्टिकच्या निर्मितीत कॅडमियम व लेडचा वापर होतो. यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यात ठेवलेले अन्न घातक ठरू शकते. कॅडमियममुळे उलट्या, हृदयविकार तर लेडमुळे मेंदूविकार संभवतात. आणखी एक धोका म्हणजे लहान मुले या बॅग तोंडाभोवती गुंडाळल्याने त्यांचा श्वास गुदमरू शकतो.

वापर कमी, पण धोका जास्त
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातील आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी 105 दशलक्ष टन प्लास्टिकची निर्मिती होते. भारतात 2.5 दशलक्ष टन प्लास्टिक तयार होते. अमेरिकेत वर्षाकाठी 10.5 दशलक्ष टन प्लास्टिक तयार होते. युरोप व इतर पाश्चिमात्य देशांत एक व्यक्ती सरासरी वर्षाकाठी 70 किलो प्लास्टिकचा वापर करते. भारतात वर्षाकाठी एक व्यक्ती 4 किलो प्लास्टिकचा वापर करते. यात 500 ग्रॅम पॉलिथीन असते. मात्र, देशात कमी जाडीच्या पिशव्या धोका वाढवतात.

प्लास्टिक म्हणजे काय ?
प्लास्टिकला शास्त्रीय भाषेत पॉलिमर म्हणतात. पॉलिमरचे हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन तसेच लिनिअर लो डेन्सिटी पॉलिइथिलीन असे प्रकार असतात. प्लास्टिकच्या पिशव्या हाय डेन्सिटी पॉलिइथिलिनपासून तयार होतात. यात जैविक तसेच कलरेंट्स, पिगमेंट्स, प्लास्टिसायझर, स्टेबलायझर आणि धातू अशा अजैविक पदार्थांचा समावेश असतो.

नियम काय सांगतो?
पॉलिथीनच्या कॅरीबॅग जल, वायू आणि भूमी प्रदूषणात मोठा घटक असल्यामुळे यावर बंदी घालण्यासाठी केंद्र शासनाचे पर्यावरण आणि वन मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाचे नियम आहेत. केंद्राचा प्लास्टिक वेस्ट (मॅनेजमेंट अँड हँडलिंग) 2011 हा कायदा आहे. तत्पूर्वी या कायद्याचे नाव रिसायकल्ड प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग अँड युसेज अँक्ट 1999 असे होते. राज्य शासनाच्या महाराष्ट्र प्लास्टिक कॅरीबॅग (मॅन्युफॅक्चरिंग अँड युसेज) रूल 2006 आणि प्लास्टिक वेस्ट (मॅन्युफॅक्चरिंग अँड हँडलिंग) कायदा 2011 अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार-

कॅरीबॅग म्हणजे इंग्रजीतील डी आकार असणार्‍या 50 मायक्रॉनच्या कमी आणि हँडल असणार्‍या पिशव्या असे शासनाच्या परिभाषेत नमूद आहे. ज्या पिशव्यांना हँडल नाही त्यांना हे नियम लागू होत नाहीत. मंगलकार्यात चिवडा-लाडू पॅक करण्यासाठी किंवा इतर सपाट, पण कमी जाडीच्या बॅगवर बंदी नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे.

कागद, पेपर बोर्ड आदींना प्लास्टिकचे आवरण दिले जाते. यास मल्टिलेव्हल पॉलिथीन असे म्हटले जाते. गुटखा, तंबाखू, पान मसालाच्या पुड्या आदीत असे प्लास्टिक वापरले जाते. अशा सॅशेसनाही बंदी आहे.
कॅरीबॅगचा वापर र्मयादित करण्यासाठी कोणत्याही ठिकाणी ग्राहकांना मोफत कॅरीबॅग देता येत नाही. पण मॉल वगळता सर्वच ठिकाणी मोफत कॅरीबॅग दिली जाते

असा आहे धोका
05 दशलक्ष टन 1950 मध्ये जगभरात प्लास्टिकची निर्मिती होत असे.
105 दशलक्ष टनवर 2012 मध्ये पोहोचली आहे. यावरून प्लास्टिकचा अत्याधिक वापर लक्षात येतो.
8% जगातील कच्चे तेल प्लास्टिकच्या निर्मितीवर खर्च होते.

1 दशलक्ष दरवर्षी सुमारे समुद्री जीवांचा प्लास्टिकमुळे मृत्यू होतो. कचर्‍यासोबत समुद्रात वाहून गेलेल्या प्लास्टिक बॅगमुळे पाण्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. यामुळे पाण्यातील जैवर्शृंखला तुटली आहे.
रंगीत पिशव्यातील घातक रसायनांमुळे जमिनीचा पोत ढासळतो. ही रसायने भूगर्भातील जलसाठे दूषित करण्यासही कारणीभूत ठरतात.

पॉलिथीनचा मुख्य धोका म्हणजे हे पूर्णपणे जमिनीत विघटीत होत नाही. त्यांचे जैव विघटन होण्याएवजी त्यांचे फोटो डिग्रेशन होते. या प्रक्रियेत पॉलिथीनची बॅग छोट्या-छोट्या भागात तुटून पसरते. पॉलिथीनची पिशवी पूर्णपणे विघटीत होण्यासाठी तब्बल 1 हजार वष्रे लागतात.

या पिशव्यांमुळे नाले, नद्या जाम होऊ शकतात. मुंबईत 2006 मध्ये मिठी नदीला आलेल्या पुराला नदीत साचलेल्या कॅरीबॅग हे मोठे कारण होते.

या राज्यांत आहे बंदी
प्लास्टिकचे हे धोके ओळखून 15 ऑगस्ट 2009 रोजी हिमाचल प्रदेश सरकारने सर्वप्रथम प्लास्टिक बॅगवर बंदी आणली.

सिक्किम आणि पश्चिम बंगालमध्ये पॉलिथीनच्या कॅरीबॅगवर आणि प्लास्टिकच्या बाटल्यांवर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे.

पॉलिथीन घातकच
राज्य शासनाने 50 मायक्रॉनच्या कमी जाडीच्या कॅरीबॅगवर बंदी घातली आहे. पॉलिथीन पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. याची कॅरीबॅग वर्षानुवष्रे कुजत नाही. यामुळे जमिनीचा पोत ढासळतो. भूगर्गातील पाण्याचे झरेही अडवले जातात. पिशवीतील अन्न खाल्ल्यामुळे प्राण्यांच्या जिवालाही धोका निर्माण होतो.
प्रवीण जोशी,प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

जमिनीचा श्वास थांबतो
पॉलिथीन हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. त्याचे विघटन होत नसल्यामुळे जमिनीचा श्वासोच्छ्वास थांबतो. जमीन पडीक होते. मला वाटते की, विक्रेते आणि याचा वापर करणार्‍यांपेक्षा 50 मायक्रॉनच्या खालील कॅरीबगचे उत्पानदनच बंद करण्यासाठी शासनाने पावले उचलायला हवीत.
डॉ. दिलीप यार्दी, संस्थापक अध्यक्ष, एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन