आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीसीटीव्ही विक्रेत्यांमुळे सकारात्मक बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सीसीटीव्ही विक्रेत्यांपाठोपाठ आता काही मंदिरांच्या विश्वस्तांनीही मंदिरात कॅमेरे बसवण्यासाठी पाऊल उचलले असून विक्रेत्यांच्या भूमिकेमुळे ही यंत्रणा बसवणे आवाक्यात आल्याची प्रतिक्रिया धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने नोंदवली आहे. दरम्यान, शिवशक्ती प्रतिष्ठानने एका मंदिरात ही यंत्रणा बसवून देण्यासाठी खर्च करण्याची तयारी दाखवली आहे.

धार्मिक स्थळांचे पावित्र्य, सुरक्षितता आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे लक्ष्य समोर ठेवून ‘दिव्य मराठी’ने धार्मिक स्थळी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आवाहन केले आहे. त्याला सर्वच भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील आठ सीसीटीव्ही विक्रेत्यांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर धार्मिक स्थळांसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवून देण्याची तयारी दाखवली. ते वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आणखी २२ जणांनी अशी तयारी आज दाखवली. त्यामुळे एकूणच शहरातील धार्मिक स्थळांना ही यंत्रणा बसवणे आवाक्यात आले आहे.

शनिवारी शहरातील विविध धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी दूरध्वनी करून ना नफा ना तोटा तत्त्वावर यंत्रणा देणा-यांचे संपर्क क्रमांक ‘दिव्य मराठी‘कडून घेतले. संबंधितांना संपर्क करून त्यांच्याकडून बजेटही घेण्यात आले. एका मंदिराच्या विश्वस्तांनी आधी घेतलेल्या कोटेशनपेक्षा २५ टक्के कमी किमतीत आता हे काम होत असल्याबद्दल ‘दिव्य मराठी’ला धन्यवादही दिले.
शिवशक्ती प्रतिष्ठानचा पुढाकार : धार्मिक स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी दानशूरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ‘दिव्य मराठी’ने केल्यानंतर लगेचच शनिवारी मयूर पार्क येथील शिवशक्ती प्रतिष्ठानने एका मंदिरात ही यंत्रणा बसवून देण्याची घोषणा केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ललित सरदेशपांडे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, मयूर पार्क भागातील दत्त मंदिरात आपण ही यंत्रणा बसवून देणार आहोत. त्यासाठी आवश्यक ती पावलेही त्यांनी उचलली.
सिडको येथील बजरंग चौकातील श्री बजरंग रिलिजियस चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हनुमानसिंग परदेशी यांनीही आज ना नफा ना तोटा तत्त्वावर यंत्रणा बसवून देणा-या विक्रेत्याकडून नव्याने कोटेशन घेतले असून लवकरच ते हनुमान मंदिरात ही यंत्रणा बसवणार असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

दानशूरांना पुन्हा आवाहन
अनेक धार्मिक संस्थांनी ही यंत्रणा बसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, त्यासाठी लागणारी रक्कम उभी करणे या संस्थांना कठीण आहे. यासाठी दानशूरांनी पुढे यावे ,असे आवाहन ‘दिव्य मराठी’ करीत आहे. त्याचबरोबर ज्या संस्थांनी पुढाकार घेऊन आपल्या प्रार्थनास्थळात सीसीटीव्ही बसवले आहेत, त्यांनी तसे छायाचित्र joshi.mandar33@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावे किंवा ९९२२९९४३२६ या मोबाइलवर व्हॉट्सद्वारे पाठवावे.