आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Positive Monday News In Aurangbaad Kidnapping On Railway Station

पाचवीतील मुलीची आपबिती, अपहरणानंतर सहा दिवस मुंबईत मागितली भीक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तान्ह्या बाळाचा बहाणा करून मुंबईतील एका महिलेने शहरातील एका वॉचमनच्या मुलीचे अपहरण केले. सहा दिवस तिला मुंबईत भीक मागायला लावली; पण दैव बलवत्तर म्हणून ती हा भयंकर अनुभव घेऊन शेवटी सुखरूप घरी परतली. त्या चिमुकलीची ही हृदयद्रावक कहाणी...
शिवराम शिंगारे आणि वंदना शिंगारे समर्थनगरमध्ये एका बांधकामाच्या साइटवर वॉचमन म्हणून काम करतात. कमावणारे एकटेच आणि खाणारे सात जण. अकरा वर्षांची वैष्णवी सर्वात मोठी आणि म्हणूनच लाडकी मुलगी. समतानगर येथील देवगिरी विद्यालयात पाचवीत शिकते. अभ्यासात हुशार, चुणचुणीत. पण हा चुणचुणीतपणाच तिला भोवला. बसस्टँडपासून रेल्वेस्टेशनला मैत्रिणीला भेटायला निघाली अन् मुंबईत पोहोचली. सहा दिवस अनोळखी महिलेसोबत, अनोळखी शहरात राहावे लागले. तिने सोसलेले दु:ख, यातना तिच्याच शब्दांत...

शनिवारचा दिवस... शाळेतून मी घरी आले. स्टेशनजवळील राजीवनगर येथे एका मैत्रिणीसोबत खेळण्यासाठी सकाळी साडेदहा वाजता मी आई-वडिलांना सांगून निघाले. बसस्टँडहून रिक्षा करून स्टेशनला जाणार होते. तेवढ्यात एक बाई समोर आली. आम्ही दोघे एकाच रिक्षात बसून गेलो. या छोट्याशा प्रवासात आमची चांगली ओळख झाली.

बाळ दिले सांभाळायला
त्याबाईचे नाव सलमा असल्याचे नंतर कळाले. सलमासोबत एक बाळ होते. मला स्टेशनच्या उड्डाणपुलाखाली जायचे होते; पण सलमा मला रेल्वेत बसायला मदत करण्यासाठी स्टेशनला घेऊन गेली. तेथे बाळाला माझ्याकडे देऊन ती पाणी आणायला गेली. रेल्वे सुरू झाली. मी तिला शोधू लागले. बघते तर काय? ती एका डब्याच्या दारात उभी राहून मला बाळ मागत होती. मी घाबरले. पळत पळत डब्यात चढले. तिला बाळ दिले. पुन्हा उतरण्याच्या तयारीत होते; पण रेल्वेने वेग धरला. मी खूप घाबरले. रडू लागले. मग सलमाने मला धीर दिला. उतरलीस तर जीव जाईल. यापेक्षा आता माझ्यासोबत मुंबईला चल. उद्या मी परत येणार आहे. मी तुला सोडून देईल.

रेल्वेस्टेशनवर सहा दिवस
दुपारी आम्ही ठाण्यात पोहोचलो. वाटले सलमा तिच्या नातेवाइकांकडे गेल्यावर जेवायला मिळेल; पण येथे वेगळेच झाले. सलमाने ठाणे स्टेशनबाहेरचा एक कोपरा धरून भीक मागण्यास सुरुवात केली. बाळ समोर करून ती लोकांकडे हात पसरत होती. सलमाने माझे अपहरण केल्याचे माझ्या लक्षात आले. थोड्या वेळाने तिने मला दम दिला. घरी परतायचे असेल तर पैसे माग. मी तिच्या बाजूला उभे राहून पैसे मागू लागले. काही तासात दोन-तीनशे रुपये जमा झाले. ही रक्कम तिच्या स्वाधीन केली. रात्री आम्ही स्टेशनवरच पोटभर जेवण केले. तेथेच झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा भीक मागण्यास सुरुवात केली. असे पाच दिवस गेले...
अचानक परतीचा प्रवास
गुरुवारी १६ तारीख उजाडली. सहावा दिवस होता. एक वाजता ती अचानक म्हणाली आपल्याला परत जायचे आहे. दोन वाजता गाडी आली. मनात भीती होतीच, पण चमत्कार झाला. संध्याकाळी आठ वाजता दोघीही औरंगाबाद स्टेशनवर होतो. मला स्टेशनवर सोडून ती गायब झाली. मग एका पोलिसाने मला क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये आणून सोडले. रात्री वडील आले. ते मला घरी घेऊन गेले.

दोन दिवस शोधाशोध
वैष्णवी मैत्रिणीकडे असल्यामुळे आई-वडील निश्चिंत होते, पण संध्याकाळ झाल्यावरही ती परतल्यामुळे त्यांनी मैत्रिणीच्या घरी धाव घेतली. शेवटी क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली; पण अखेर १६ तारखेला वैष्णवी परतली.

पोलिसांनी मदत केली
^ आम्ही गरीब लोक, पण मुलगी हरवल्याची तक्रार देताच पोलिस कामाला लागले. तीन वेळा आमच्याकडे येऊन गेले. मुलगी हरवल्याची माहिती त्यांनी मुंबईला दिली. याची कुणकुण लागल्यामुळेच महिलेने तिला आणून सोडले.
-वंदना शिंगारे, मुलीची आई

देवतारी तिला...
^ हरवलेली मुले सापडण्याचे प्रमाण खूप कमी असते, पण आमची मुलगी सहा दिवस अपहरणकर्त्याच्या तावडीत राहून मुंबईहून सुखरूप परतली. देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय आम्हाला या घटनेने आला. -शिवराम शिंगारे, मुलीचे वडील

अनोळखी लोकांपासून सावध राहावे
^आई-वडिलांना सोडून राहण्याची कधीच सवय नव्हती, परंतु अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे सहा दिवस अनोळखी महिलेसोबत राहावे लागले. तिने त्रास दिला नाही, पण सतत धमक्या देत होती. लहान मुलांनी कधीच अनोळखी लोकांसोबत जाऊ नये. त्यांच्या अामिषाला बळी पडू नये. -वैष्णवी शिंगारे, अपहृत मुलगी