आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षित भूखंडांवरील पोस्ट कार्यालय, बँक, शॉपिंग सेंटर, क्रीडांगण कागदावरच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरक्षित भूखंडाचा विकास केल्यामुळे या जागांवर खासगी वाहने उभी केली जातात, तर काही ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवले जाते. - Divya Marathi
आरक्षित भूखंडाचा विकास केल्यामुळे या जागांवर खासगी वाहने उभी केली जातात, तर काही ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवले जाते.
औरंगाबाद- म्हाडाची सर्वात जुनी असलेली शहरातील पहिली वसाहत म्हणून एकनाथनगरची ओळख आहे. मात्र, गेल्या ५० वर्षांत म्हाडाने इथे म्हणाव्या तेवढ्या सुविधा दिल्याच नाहीत. पोस्ट ऑफिस, बँक, शॉपिंग सेंटर आणि क्रीडांगणासाठी असलेले आरक्षित भूखंड आजही ओस पडलेले दिसतात. पोस्टाने ही जागा मोफत मागितली आहे, तर म्हाडा ती विक्री करू इच्छिते. यामुळे या मोकळ्या जागा कचऱ्याचे आगार बनल्या आहेत. ही वसाहतच आजारी पडल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

उस्मानपुरा भागातील एकनाथनगरात म्हाडाने १९६५ मध्ये गृनिर्माण योजना राबवली. त्याअंतर्गत नगर भूमापन क्रमांक १६३२३ वर ५५० सदनिका बांधण्यात आल्या. येथील रहिवाशांच्या सोयीसाठी या भागात एक पोस्ट कार्यालय, बँक, शॉपिंग सेंटर आणि क्रीडांगणासाठी भूखंडही आरक्षित ठेवण्यात आले. मात्र, वसाहतीची पन्नाशी उलटूनही या सोयी अद्याप मिळालेल्या नाहीत. सद्य:स्थितीत बँकेसाठी अडीच हजार, पोस्ट ऑफिससाठी दोन हजार, शॉपिंग सेंटरसाठी ७५० आणि क्रीडांगणासाठी ३१,७५० चौरस फुटांचे आरक्षित असलेले भूखंड कचरा टाकण्याची ठिकाणे बनली आहेत. 
 
खरेदी प्रक्रिया झालीच नाही 
जून२०११ मध्ये आरक्षित भूखंडांच्या विक्रीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. यात बँकेसाठी १५६०, तर पोस्ट ऑफिससाठी १०८०० रुपये प्रतिचौरस मीटर दराने अंतिम विक्री करण्यास मुख्य अधिकाऱ्यांनी मंजुरीही दिली होती. यानंतर २८ डिसेंबर २०१२ रोजी म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी पोस्ट ऑफिस उघडण्याबाबत वरिष्ठांना कळवलेही होते. मात्र, पोस्ट कार्यालयाने हा भूखंड मोफत देण्याची मागणी केल्याने ही खरेदी प्रक्रिया झालीच नाही. 

मोकळ्या जागांवर साहित्य 
घरमालकांच्यातक्रारीवरून डीबी स्टार चमूने या वसाहतीतील आरक्षित भूखंडांची पाहणी केली असता या ठिकाणी खासगी साहित्य ठेवल्याचे दिसून आले. लोकांनी काही ठिकाणी बांधकाम साहित्य आणि टाकाऊ साहित्य मोकळ्या जागेत आणून टाकले आहे. ही नेहमीचीच डोकेदुखी असल्याचे नागरिकांनी सांगितले. काहींनी या जागेवर खासगी बसेसची अवैध पार्किंग केली आहे. रात्रीच्या अंधारात इथे गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर असल्याचेही नागरिकांनी सांगितले. 

माहिती घेऊन प्रश्न मार्गी लावणार 
एकनाथ नगरातील म्हाडावसाहत खूप जुनी झाली. आतापर्यंत तेथे बँक आणि पोस्ट या दोन्ही सुविधा देणे बंधनकारक होते. काही अधिकार आम्ही सोसायटीलाही दिलेले आहेत. इतर सुविधा मनपाकडे हस्तांतरित केलेल्या आहेत. मात्र, बँक आणि पोस्ट ऑफिसचा प्रश्न का रेंगाळला याची मी तातडीने माहिती घेतो आणि प्रश्न मार्गी लावतो.
- डॉ.अनिल रामोड, मुख्यकार्यकारी अधिकारी, म्हाडा 

नागरिकांचा पाठपुरावा, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 
लोडबेअरिंगमध्ये बांधलेल्या या वसाहतीचे वय आता ५३ वर्षांचे झाले आहे. मात्र, अद्यापही आरक्षित केलेल्या जागांवर सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. आरक्षित भूखंडांचा सर्रासपणे खासगी वापर होत आहे. १६ नोव्हेंबर १९८७ पासून म्हणजे साधारण ३० वर्षांपासून एकनाथनगरवासीय आरक्षित भूखंड विकसित करण्याबाबत पाठपुरावा करत आहेत. मात्र, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी याकडे दुर्लक्ष करत प्रश्न निकाली काढला नाही. 
बातम्या आणखी आहेत...