आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पोस्टर बॉईज’ पुन्हा प्रकटले; मनपाची कारवाई थंडावली, न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- फुकटात प्रसिद्धी मिळवणा-या आणि चमकोगिरी करणा-या ‘पोस्टर बॉईज’नी पुन्हा तोंड वर काढले आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली करत शहरभर पुन्हा पोस्टरचे तसेच पॉम्प्लेट आणि बॅनरचे पेव फुटले असून महापालिका, पोलिसांना पुन्हा डुलकी लागली आहे. शहराच्या विद्रूपीकरणात राजकीय पक्षांबरोबर खासगी शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेसचे मोठे योगदान आहे.
शहरभर झळकरणा-या अनधिकृत होर्डिंगबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. अनधिकृत होर्डिंगवर तत्काळ कारवाई करून ते हटवण्यात यावेत, असे आदेश काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. तसेच जाहिरातींच्या होर्डिंगवर मनपाचा जाहिरात क्रमांक, जाहिरातदाराचा संपर्क क्रमांक आणि परवानगीच्या पावतीचा क्रमांक असणे आवश्यक असल्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत पोस्टरबाजांचे ‘दुकान’ बंद केले. आता मात्र पोलिसांनी हात वर केले आहेत.
...अन् कारवाई थंडावली
अरुण बोर्डेंच्या वाढदिवसानिमित्त शहरभर लागलेल्या अनधिकृत फलकांमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला होता. डीबी स्टारने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. मनपाने बैठक घेऊन आकार, परिसर यावरून अनधिकृत जाहिरातींवर दंड आकारण्याबरोबर जाहिरातीसंदर्भात काही मापदंड ठरवून दिले होते. पोलिसांनी अनधिकृत बॅनर लावणा-यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कारवाई थंडावली असून अनधिकृत पोस्टर्सचे पुन्हा पेव फुटत आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौकात फलक आणि सिग्नल, पथदिव्यांच्या खांबांवरही बॅनर लावले जात आहेत. खासगी क्लासेसच्या जाहिरातीचे फलक आणि पॉम्प्लेट ठिकठिकाणी लावलेले दिसत आहे.
राजकीय पुढारी ‘आघाडी’वर
दोन महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. या धर्तीवर राजकीय पक्षांचे मेळावे, बैठका होत असून शहरात येणा-या वरिष्ठ पदाधिका-यांच्या नजरेत भरण्यासाठी स्थानिक नेते त्यांचे स्वागत करणारे बॅनर लावून चमकोगिरी करत आहेत.
कुणालाच सोयरसुतक नाही

न्यायालयाचे आदेश धुडकावून न्यायालयासमोरच जालना रस्त्यावर पथदिव्यांना अशोक उकिर्डे यांनी काँगे्रसचे नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या स्वागताचे पोस्टर लावले आहेत. याच्या दोन दिवसांपूर्वीच विभागीय संकल्प मेळाव्यानिमित्त शहरात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जितेंद्र देहाडे यांनी गजानन महाराज मंदिर, दर्गा रोडच्या दुभाजकावर मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली होती. भाजपच्या अतुल सावे यांचेही बॅनर गजानन महाराज चौकात झळकत आहे. याशिवाय पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या चेतना मेळाव्याच्या पोस्टर्सनी तर अख्खे शहर व्यापले आहे. मग रिपाइं तरी कशी मागे राहील? खासदार रामदास आठवलेंच्या स्वागतासाठी जालना व जळगाव रोडवर बाळकृष्ण इंगळे यांचे पोस्टर्स् लटकत आहेत. परिणामी या चमकोगिरीमुळे पर्यटननगरीच्या विद्रूपीकरणाबरोबर वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. मात्र, याचे याचे सोयरसुतक ना राजकीय पक्षांना आहे, ना ढिम्म मनपाला.
लढा सुरू ठेवणार
मनपाचेच अनेक अनधिकृत होर्डिंग आहेत. उद्या अपघात झाला तर याची जबाबदारी कुणाची? नेहमी राजकीय पक्षांनाच टार्गेट केले जाते. मनपाने अधिकृत होर्डिंगच्या जागांची यादी जाहीर करावी.-अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
हे चूकच आहे
पोस्टर लावणा-यांनी परवानगी घेतली आहे की नाही, याची कल्पना नाही. पण कोणत्याही पक्षाने शहराची प्रतिमा खराब होईल, वाहतुकीला अडथळा येईल असे होर्डिंग, पोस्टर लावू नयेत. ते अयोग्यच आहे. आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही तशा सूचना देवू.
- केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
परवानगी घेतली
भाजपचे कार्यकर्ते कोणतेही काम परवानगीशिवाय करत नाहीत. इतर पक्षांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी पूर्वपरवानगी घेऊनच पोस्टर, होर्डिंग लावले असतील. - एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप
मी सूचना करतो
आम्ही एकही अनधिकृत होर्डिंग किंवा पोस्टर लावलेले नाही. मी कार्यकर्त्यांनाही अनधिकृत आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा जाहिराती न लावण्याच्या सूचना करतो. मनपाने सेंट्रलाइज सिस्टिम बनवावी, काही जागा निश्चित करून द्याव्यात. - विनोद पाटील, शहराध्यक्ष, राष्‍ट्रवादी काँगे्रस

थेट सवाल

अनधिकृत पोस्टरवरील कारवाई का थंडावली?
शहरातील अनधिकृत जाहिरातींचा विषय मनपाच्या अखत्यारीत आहे. यावर त्यांच्याकडूनच कारवाई होणे अपेक्षित आहे.

पण तत्कालीन पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले होते...
-मनपाने अशा जाहिरातींबाबत आमच्याकडे तक्रार द्यायला हवी. त्यानंतर अनधिकृत जाहिरात लावणा-याचा छडा लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील.