आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - व्यसनापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी सरकार पातळीवर अनेक प्रकारे प्रयत्न सुरू आहेत; परंतु राहुल धोंडिराम थोरात या चित्रकाराने तंबाखूच्या व्यसनामुळे होणा-या विकारांवर पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून केलेली जनजागृती उल्लेखनीय आहे. रंग आणि कुंचल्याच्या आधारे समाजसेवा करणारा राहुल दरवर्षी तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करतो. या वर्षी 31 मे ते 2 जूनदरम्यान राहुलने सिडको बसस्थानकावर तीनदिवसीय प्रदर्शन भरवले होते. याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
राहुलचे वडील घाटी रुग्णालयात लिपिक पदावर कार्यरत आहेत. शासकीय कला महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्याने नागपूर विद्यापीठातून ‘मास्टर ऑफ फाइन आर्ट’ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर काही दिवस त्याने सावंतवाडी येथे बी.एस. बांधेकर कला महाविद्यालयात नोकरी केली. मागील सहा वर्षांपासून राहुल हा मुंबई येथील जे.जे. स्कूल ऑफ अॅप्लाइड आर्टमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहे.
जगात दरवर्षी 50 लाखांपेक्षा अधिक जण तंबाखूमुळे मृत्युमुखी पडतात. यातील 70 टक्के तरुण आहेत. ही विदारक परिस्थिती राहुलला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे ठरवले आणि सावंतवाडी, मुंबई, परभणी, सिंदखेडराजा, नागपूर, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी त्याने प्रदर्शन भरवले आहे. त्याने रेखाटलेली चित्रे इतकी वास्तववादी आहेत की तरुण मुले हे प्रदर्शन पाहिल्यानंतर खिशातील गुटख्याच्या पुड्या एकत्र जमा करून फेकून देतात. अशा प्रकारे विविध सामाजिक विषय घेऊन तयार केलेल्या पोस्टरला राज्यस्तरावर आठ आणि राष्ट्रीय स्तरावर दोन पारितोषिके मिळाली आहेत.
तंबाखूचे व्यसन करणा-यांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. ग्रामीण भागात हे व्यसनाधीनतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. कलेच्या माध्यमातून सामाजिक जागृती करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.’’राहुल थोरात, चित्रकार
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.