आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिकेची इमारत निरीक्षकांना नोटीस, एका दिवसात सर्व पोस्टर काढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील सर्व पोस्टर एका दिवसात काढा, असे आदेश मनपाने इमारत निरीक्षकांना दिले आहेत. कामात कुचराई केल्याबद्दल त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही या वेळी देण्यात आले. या प्रकरणी महानगरपालिकने तीन स्वतंत्र चौकशी पथकांची स्थापनाही केली आहे. याबाबत डीबी स्टारने सातत्याने वृत्त प्रकाशित करून त्याचा पाठपुरावादेखील केला आहे.

विविध पक्षांनी शहरभरात पोस्टरबाजी करून कचरा करत आहेत. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होऊन अनेक ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा होतो. त्यावर डीबी स्टारने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून या प्रकारांना वाचा फोडत आहे.
अलीकडेच ‘राजकारण्यांनी केला पुन्हा कचरा...’ या मथळ्याखालीही वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. दरम्यान, रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शहरात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक नेत्यांनी जालना रोडवर पोस्टर्स लावले. आचारसंहिता लागू झाली असतानाही ही पोस्टरबाजी झाली. त्यावर चमूने १५ सप्टेंबर रोजी ‘मनसेची पोस्टरबाजी..आचारसंिहतेचा भंग?’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या हालचालींना वेग आला. याबाबत डीबी स्टारने जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी तत्काळ मनपा आयुक्तांना चौकशीची सूचना दिली. मनपा आयुक्तांनीही पोस्टर काढण्याचे आदेश विभागांना दिले. मात्र, तरीही कारवाई करण्यात आली नाही. डीबी स्टारने पुन्हा पाठपुरावा केला असता मनपा उपायुक्तांनी इमारत निरीक्षकांना नोटीस पाठवून एका दिवसात पोस्टर उतरवण्याचे तसेच फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

पोस्टर बेकायदाच मनसेने विमानतळ ते मुकुंदवाडी बसथांबा येथील खांबांवरील पोस्टर काढले, परंतु वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे रस्ता दुभाजकांच्या मधोमध असलेले पोस्टर तसेच ठेवण्यात आले. याबाबत मनसेच्या शहर प्रमुखांकडे चौकशी केली असता, आम्ही पैसे भरले आहेत आणि रीतसर परवानगीदेखील घेतली असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे प्रशासनाने हे पोस्टर बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. आदर्श आचारसंहिता लागू असताना अशी पोस्टर्स लावण्याची परवानगी देताच येत नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
इमारत निरीक्षकाला कारणे दाखवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पोस्टरबाजीसंदर्भात इमारत निरीक्षक पी. बी. गवळी यांना मी पोस्टर तत्काळ काढण्याचे आदेश रविवारी दिले होते, परंतु त्यांनी आदेशाचे पालन केले नाही. याबाबत त्यांना कामात कुचराई केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहितीही महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. आशिष पवार यांनी दिली.

कारवाईचा अहवाल मागवतो
याबाबत डीबी स्टारकडून माहिती मिळाल्यानंतर मी तत्काळ मनपा आयुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानंतर कोणती कार्यवाही करण्यात आली, याचा अहवाल मागवतो.
विक्रमकुमार, जिल्हाधिकारी

मी कारवाईचे आदेश दिले
रविवारीच संबंधित विभागाला सर्व होर्डिंग्‍ज, पोस्टर आणि बॅनर काढण्यास सांगितले होते. तसेच कामात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले.
प्रकाश महाजन, आयुक्त, मनपा
पुन्हा चौकशी करतो
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त पवार यांना मी तत्काळ सूचना केल्या असता त्यांनी त्याच दिवशी कर्मचाऱ्यांना होर्डिंग्‍ज आणि पोस्टर काढायला सांगितल्याचे आम्हाला कळवले होते; तरीही कारवाई झाली नसेल तर पुन्हा या प्रकरणी चौकशी करतो
रमेश पवार, अतिरिक्त आयुक्त, मनपा

गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले
रविवारीच इमारत निरीक्षक पी. बी. गवळी यांना आयुक्तांचे आदेश आल्यानंतर सर्व पोस्टर, बॅनर व होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते. त्यांनी कामात कसूर केल्याबद्दल त्यांना नोटीस बजावली आहे. संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.
डॉ. आशिष पवार, उपायुक्त, मनपा