आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरमेहर कौरचे पडसाद: ‘एसएफआय’, ‘अभाविप’मध्ये पोस्टर वॉर, विद्यापीठात संघर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रोहित वेमुलाचा मृत्यू कन्हैयाकुमारच्या कारावासामुळे विद्यार्थी संघटनांमधील पेटलेला संघर्ष थांबण्याच्या स्थितीत दिसत नाही. अभाविप विरुद्ध सर्व डाव्यांच्या आंदोलनाच्या ठिणग्या आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही धडकण्यास सुरुवात झाली आहे. अभाविपने मार्च रोजी सुरू केलेल्या पोस्टरबाजीला एसएफआयनेही कडाडून उत्तर दिले आहे. 

वेमुलाच्या मृत्यूनंतर देशभर झालेली आंदोलने, जेएनयूच्या कन्हैयाकुमारच्या कारावास प्रकरणावर पडदा पडण्यापूर्वीच दिल्लीच्या रामजस कॉलेज प्रकरणामुळे अभाविप आणि एसएफआय-एआयएसएफ वाद पुन्हा पेटला आहे. पुण्यात एसएफआय कार्यकर्त्यांना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच मारहाण केली. त्यामुळे ‘रामजस’ वादाने आता महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे. गुरमेहर कौर प्रकरणामुळे तर देशभर सध्या पोस्टर वॉर सुरू आहे. सर्वप्रथम सोशल मीडियावरून पोस्टरबाजी करण्यात आली. ‘वुई आर नॉट अफ्रेड फ्रॉम एबीव्हीपी, वुई विल फाइट अगेन्स्ट कास्टिझम’ असे पोस्टर झळकले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठ, जेएनयूमध्येही असेच पोस्टर वॉर सुरू आहे. हे लोण आता येथील विद्यापीठातही पोहोचले आहे. अभाविपने आधी मार्च रोजी विद्यापीठातील कँटीन, शैक्षणिक विभाग आणि मानव्य विद्याशाखेच्या इमारतीत पोस्टरबाजी केली. 

दोन्ही संघटनांचा ठोशास ठोसा 
‘नक्षलवादना माओवाद, सबसे ऊपर राष्ट्रवाद’ असे पोस्टर लावून अभाविपने एसएफआयला डिवचले. त्यानंतर ‘समता हवी की समरसता..?’ , ‘राष्ट्रवाद म्हणजे काय रे भाऊ’ असे पोस्टर लावले गेले. ‘भारत तेरे टुकडे होंगे इन्शा अल्लाह..इन्शा अल्लाह’ हा देशद्रोह नव्हे तर काय, असा सवाल अभाविपने पोस्टरमधून उपस्थित केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘सैनिक त्यांच्या पत्नीबद्दल अश्लील वक्तव्य करणे हीच का तुमची देशभक्ती...जवाब दो...जवाब दो’ असे पोस्टर एसएफआयने लावले. ‘हमे चाहिए आजादी, नक्षलवाद से आजादी, वामपंथीयों से आजादी, आतंकवाद से आजादी’ या पोस्टरच्या उत्तरात ‘भारत के आजादी में तुम्हारी कितनी भागीदारी..?’ असा सवाल एसएफआयने उपस्थित केला. मार्चपासून सुरू झालेले हे पोस्टर युद्ध हिंसक वळण घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वेळीच हे पोस्टर वॉर थांबवणे आवश्यक असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. 

न्यायमूर्तींचा पुतळा जाळण्यातून डाव्यांचा दुटप्पीपणा सिद्ध होतो 
प्रोफेसर डॉ.साईबाबांना जन्मठेप देणाऱ्या न्यायमूर्तींच्या पुतळ्याचे डाव्या संघटनांनी दहन केले. एकीकडे भारतीय संविधानाचे गोडवे गायचे अन् दुसरीकडे न्यायव्यवस्थेवर चिखलफेक करायची. न्यायमूर्तींचे पुतळे जाळण्यातूनच यांचा दुटप्पीपणा सिद्ध होतो. गुरमेहर कौरच्या संदर्भात ज्यांनी धमकी दिली, त्यांच्यावर कारवाईची मागणी सर्वात आधी आम्हीच केली. काश्मीरप्रश्नी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. 
- शिवादेखणे, मध्य भागमंत्री, अभाविप 

बलात्काराची धमकी देणे हीच संघाची खरी संस्कृती 
देशभक्तीचा टेंभा मिरवणाऱ्या अभाविपने शहिदाच्या मुलीवर बलात्काराची धमकी दिली, हाच त्यांचा खरा चेहरा आहे. काश्मीर प्रश्नावर दुसऱ्यांना लक्ष्य करायचे, मात्र पीडीपीसोबत युती करून सत्तेची फळे चाखायची. सर्वसामान्यांमध्ये संघ विचारांची दहशत पसरवण्यासाठी देशातील सर्वच प्रमुख शिक्षण संस्थांवर हल्ले सुरू आहेत. ज्यांनी हयातभर संविधानविरोधी भूमिका घेतली, ते आज विद्यापीठात देशभक्तीचा टेंभा मिरवत आहेत. अशा प्रवृत्तींना आम्ही विद्यापीठात शिरकाव करू देणार नाही. 
- सुनील राठोड, राज्य उपाध्यक्ष, एसएफआय 

सळो की पळो करू : बहुजन क्रांती मोर्चा 
ज्ञानभूमीत संघ, भाजप आणि अभाविपने धुमाकूळ घातला असून देशभर जातीय अराजकतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारच्या प्रोत्साहनानेच हे होत असल्याचा आरोप बहुजन क्रांती मोर्चाच्या युवकांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. या विद्यापीठाला संघर्ष, त्याग हुतात्म्यांच्या बलिदानाचा इतिहास आहे. येथे अभाविप, भाजपने जातीयवादी विष कालवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही, अशा धर्मांधांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम उधळून लावणाऱ्या आनंद लोखंडे, कमलेश चांदणे आणि सचिन शिंदे यांनी दिला आहे. 
बातम्या आणखी आहेत...