आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Potanusara Kharipaci Planting Issue At Aurangabad, Divya Marathi

पोतानुसार खरिपाची पेरणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील शेकटा, महेबूबखेडा आणि शिरेगाव येथील शेतकर्‍यांनी जमिनीच्या पोतानुसार खरीप पेरणी करण्याचा अभिनव संकल्प केला आहे. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राची मदत घेतली आहे. केंद्रातील कृषी अधिकार्‍यांनी या तीन गावांच्या शेतातील मातीचे 269 नमुने माती परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आठ दिवसांत मिळणार आहे. कोणतेही एकच पीक न घेता मातीच्या पोतानुसार पेरणी, खताचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे जमिनीची सुपीकता कायम राखून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेणे सहज शक्य होणार आहे.

मनुष्याच्या आरोग्याप्रमाणेच जमिनीचे आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. मात्र, याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. याउलट शेतीमधून अधिक उत्पादन घेण्यासाठी भरमसाट रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर केला जातो. शेती कोणत्या पिकासाठी फायदेशीर ठरेल याचा विचार न करता एकच पीक सतत घेतले जाते. पाण्याच्या आयोग्य वापरामुळे शेतीचे आरोग्य बिघडून खर्च अधिक व उत्पादन कमी होते. पीककर्जही त्यांना फेडता येत नाही. त्यामुळे शेतीचे आरोग्य टिकवण्यासाठी मृदा व पाणी परीक्षणावर आधारित पिकाचे सुयोग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने अभियान राबवण्यात येत आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मेहबूब खेडा, शेकटा व शिरेगावच्या शेतकर्‍यांनी पुढाकार घेऊन माती परीक्षणानेच खरीप पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने मातीचे 269 नमुने घेऊन ते प्रशोगशाळेत 28 मे रोजी देण्यात आले आहेत. पुढील आठ दिवसांत माती परीक्षणाचा अहवाल या शेतकर्‍यांना प्राप्त होणार आहे. त्यानंतर शेत जमीन कोणत्या पिकासाठी फायदेशीर ठरेल. खत कोणते व किती वापर करायचा याचे नियोजन करणे शेतकर्‍यांना शक्य होणार आहे.