आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडका बंधारा काेरडा पडल्याने परळीतील वीज निर्मितीवर अाेढवले संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- वीजनिर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करणारा खडका बंधारा कोरडा पडल्याने येथील २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाच दुपारी तीन वाजता बंद करण्यात आला. ११३० मेगावॅट क्षमता असलेल्या केंद्रामध्ये २५० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक सातमधूनही केवळ १९० मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे. विशेष म्हणजे वीज निर्मिती केंद्राची परिस्थिती पाण्याअभावी खालावत असल्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात अाली हाेती.

खडका बंधाऱ्यातील पाणी संपल्यास माजलगाव किंवा पैठण धरणातून परळीच्या वीज निर्मिती केंद्राला पाणी सोडण्यात येते. तशी सोय दोन्ही धरणातून खडका बंधाऱ्यापर्यंत करण्यात आलेली आहे.

मागील वर्षी दुष्काळामुळे माजलगाव धरण कोरडेच राहिले होते. पैठणच्या धरणातून यंदा थर्मलला तीनदा पाणी सोडण्यात अाले. सध्याही याच धरणातील पाण्यावर वीज निर्मिती सुरू होती. या धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आल्याने परळीच्या केंद्राला पाणी मिळाले नाही. खडका बंधारा परिसरात जूनच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाल्याने याच पाण्यावर परळीतील निर्मिती सुरू होती. कोळशाअभावी २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन पंधरा दिवसांपूर्वी बंद करण्यात आला. यंदा वार्षिक देखभालीसाठी २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक चार दोन महिन्यांपासून बंद होता. आठ दिवसांपूर्वी पाण्याअभावी संच क्रमांक सहा बंद केला होता. पावसाच्या आशेवर २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाच २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सात हे दोन संच सुरू होते.

रविवारी रात्री आठ वाजता २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाचच्या बॉयलरमध्ये कोळसा टाकण्यास बंद करण्यात आले होते. सोमवारी दुपारी तीन वाजता हा संचही बंद करण्यात आला.
केवळ १९० मेगावॅट वीज निर्मिती, ११३०मेगावॅट क्षमता असलेल्या केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक सातमधून केवळ १९० मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे. तोही संच पाण्याची काटकसर करून चालवण्यात येत आहे. ऊर्जा विभागाकडून आदेश येताच २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सातही बंद करण्यात येणार असल्याची माहिती वीज निर्मिती केंद्राचे जनसंपर्क अधिकारी एस. ई. गिरी यांनी दिली.