आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीआर कार्डसाठी आज जा,उद्या याच ; वर्षभरापासून 800 अर्ज खोळंबले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सामान्य नागरिकांची महसूल विभागातील कामे तातडीने होण्यासाठी शासनाने नागरिकांची सनद काढली. त्यानंतरही या विभागाशी संबंधित कामे नियमानुसार दिलेल्या कालावधीत होत नाहीत. नगर भूमापन कार्यालय हे याचे उत्तम उदाहरण. पीआर कार्ड ही सामान्य नागरिकांसाठी गरजेची गोष्ट आहे. या कार्डामुळे मालमत्तेवरील अधिकार बळकट होतो. मात्र, भूमापन कार्यालय कोणतेही ठोस कारण न सांगता नागरिकांना सतत चकरा मारायला लावत आहे. या विभागाबद्दल अनेक नागरिकांनी डीबी स्टारकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर चमूने तपास केला असता नगर भूमापन कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आला.

तक्रार करूनही फायदा नाही
नगर भूमापन कार्यालयाच्या मनमानी कारभाराबद्दल जुनेद खान या तरुणाने जमाबंदी आयुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनीसुद्धा याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. त्यानंतर जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख) यांनाही निवेदन देण्यात आले होते, परंतु त्यांनीही केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेली. या दिरंगाईच्या धोरणामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर परिणाम होत असल्याचे जुनेद खान यांनी सांगितले.

नामांतर म्हणजे काय?
कुठल्याही ग्राहकाला फ्लॅट/जमीन खरेदी करण्यापूर्वी त्या जागेचे पीआर कार्ड आधीच्या मालकाच्या नावे असते. खरेदीनंतर ते ग्राहकाने आपल्या नावावर करून घ्यायचे असते. खरेदी व्यवहार झाल्यावर पूर्वीचा मालक ग्राहकाच्या नावे रजिस्ट्री करतो. त्यानंतर ग्राहकाला पीआर कार्ड मिळवण्यासाठी नगर भूमापन कार्यालयात रीतसर अर्ज दाखल करावा लागतो. यालाच नामांतर असे म्हणतात. सिटिझन चार्टरनुसार प्रकरण वादग्रस्त नसल्यास फक्त एक महिन्यात अर्जदाराला पीआर कार्ड देणे बंधनकारक आहे.

काय आहे नियम?
महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘नागरिकांची सनद’ (सिटिझन चार्टर) मध्ये कोणत्या कामासाठी किती कालावधी असावा याचे नियम आखून देण्यात आले आहेत.
0 मिळकत पत्रिकेच्या (नवीन पीआर कार्ड) नकलांसाठी एक दिवस.
0 नकाशा, जबाब, स्क ीम, फाळणी इत्यादीच्या नकलांसाठी 3 दिवस.
0 मोजणीसंदर्भात परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यास चलन पास करण्यासाठी एक दिवस.
0 अर्जानुसार मोजणी करण्यासाठी अति अतितातडी : 10 दिवस, अतितातडी : 2 महिने, तातडी : 3 महिने आणि साधी : 6 महिने.
0 फेरफार नोंदी-वारस, खरेदी, मृत्युपत्र, बक्षीसपत्र, बोजा नोंद इत्यादीसाठी एक महिना.

प्रातिनिधिक उदाहरण

सिल्क मिल कॉलनी येथे राहणार्‍या सलमा बेगम यांनी जहागीरदार कॉलनीतील मिर्झा सालार बेग यांच्याकडून जमीन खरेदी केली आहे. त्यानंतर त्यांनी नगर भूमापन कार्यालयात नामांतरासाठी 11 मार्च 2011 रोजी अर्ज दाखल केला. अर्जासोबत त्यांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडली, परंतु दोन वर्षे झाली असून अद्यापही त्यांना पी. आर. कार्ड देण्यात आलेले नाही. कार्यालयातील कर्मचारी कोणतेही ठोस कारण सांगत नाहीत; पण आज जा, उद्या या, असेही म्हणतात.

पीआर कार्ड कशासाठी?

पीआर कार्ड म्हणजेच प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कार्ड होय. पीआर कार्डवर तुमचे नाव असणे म्हणजे संबंधित प्रॉपर्टी तुमच्या मालकीची असणे होय. यावरूनच तुमचा त्या संबंधित प्रॉपर्टीवर मालकी हक्क सिद्ध होतो. कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना ती समोरच्या व्यक्तीच्या नावावर आहे की नाही हे पीआर कार्डवरूनच कळते. थोडक्यात पीआर कार्डवरून संबंधित प्रॉपर्टीची वैधता सिद्ध होते.

काय म्हणतात नगर भूमापन पीडित

आम्ही एक वर्षापूर्वी 14 पीआर कार्डसाठी नामांतर अर्ज दाखल केला आहे. मात्र, नगर भूमापन कार्यालयातील कर्मचारी विविध कारणे सांगून टाळाटाळ करतात. दर आठ दिवसांनी या कार्यालयातील कर्मचारी बदलत असतात. त्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे.
इलियास खान

सर्व आवश्यक कागदपत्रांसह नामांतरासाठी अर्ज सादर करून सात महिने झाले तरी मला अद्याप पीआर कार्ड देण्यात आलेले नाही. या कार्यालयातील कर्मचारी कोणतेही ठोस कारण सांगत नाहीत, पण कामही करत नाहीत. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरूनच आम्ही असे करत असल्याचे ते सांगतात.
रत्नाकर शिंदे

सहा महिने झाले तरी पीआर कार्ड मिळाले नाही. कार्यालयात गेल्यावर कर्मचारी जागेवर नसतात. हो म्हणतात, पण कामही करत नाहीत. पैसेही मागतात, पण 5 ते 10 हजार रुपये आम्ही कोठून आणणार?
मोहंमद रफिउद्दीन अहमद मोईउद्दीन

अर्ज करून दोन महिने झाले. अद्याप या कार्यालयाकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. पीआर कार्ड न देण्याचे कोणतेही ठोस कारण सांगत नाही. यामुळे माझी अनेक कामे रखडलेली आहेत. नियमानुसार एक महिन्यात कार्ड देण्यात यावे.
रविकांत साळवे

नामांतरासाठी अर्ज करून दीड वर्ष झाले आहे. मात्र, अद्याप पीआर कार्ड मिळालेले नाही. अपुरा कर्मचारी वर्ग, फाइल सापडत नाही, साहेब जागेवर नाहीत अशी कारणे सांगून टाळाटाळ केली जाते. कागदपत्रे देऊनही कार्ड का दिले जात नाही?
सय्यद अख्तर

नगर भूमापन अधिकारी, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, आम्ही आमच्या पद्धतीनेच काम करणार, अशी अरेरावीची भाषा नेहमी करतात. सिटिझन चार्टरनुसार नामांतरासाठी अर्ज दाखल केल्यानंतर एक महिन्यात पीआर कार्ड देण्याचा नियम आहे. मात्र, हा नियम सर्वत्र अगदी बिनधास्तपणे पायदळी तुडवला जात आहे.
जुनेद खान, तक्रारदार

प्रस्ताव तपासून पाहावे लागतील
नगर भूमापन विभागात कोणतीच प्रकरणे सहा महिने, एक वर्षापर्यंत प्रलंबित राहत नाहीत. ज्या लोकांची प्रकरणे प्रलंबित असतील त्यांच्या प्रस्तावात उणिवा आहेत का किंवा ते प्रताक्षेवर आहेत का हे तपासून पाहावे लागेल.
सेठिया, नगर भूमापन अधिकारी

प्रकरणे तत्काळ मार्गी लावतो
सय्यद साहेब रजेवर गेल्यामुळे मी इतक्यातच चार्ज घेतला आहे. वेळेवर कामे होत नसतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. ज्या अर्जदारांची प्रकरणे प्रलंबित आहेत त्या प्रकरणांची उद्याच्या उद्या चौकशी करून मार्गी लावतो.
बी. डी. काळे, प्रभारी अधीक्षक, भूमी अभिलेख