आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत साहित्याचे अभ्यासक गेले; साहित्य जगत पोरके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतील ज्ञानेश्वरीच्या प्रतींचे संकलन करून प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी तयार करण्याचे काम करणारे प्राचार्य रामदास डांगे यांच्या निधनाने संत साहित्याचा एक गाढा अभ्यासक हरवल्याची हळहळ साहित्य वतरुळातून व्यक्त होत आहे. प्राचार्य डांगे यांचे निधन मंगळवारी (दि.एक) पहाटे मुंबईत झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर परभणीत सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

विदर्भातील मूर्तिजापूर हे प्राचार्य डांगे यांचे जन्मगाव असले, तरी त्यांची कर्मभूमी परभणीच होती. विद्यार्थिदशेतच त्यांनी अभ्यासू विद्यार्थी अशी निर्माण केलेली ओळख आयुष्यभर कायम ठेवली. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले होते. विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. संशोधन कार्यातील त्यांची शिस्त आणि प्राचार्यपदी असताना त्यांच्यातल्या कठोर शिक्षकाचा प्रत्यय सर्वांनाच येत गेला. अध्यापन कार्यासोबतच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांतही ते हिरिरीने सहभागी होत. मराठवाडा विकास आंदोलनातही त्यांनी विद्यार्थी नेत्यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत योगदान दिले.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात 1961 मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालेल्या डांगे यांनी परभणीतील शिवाजी महाविद्यालय, गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालय व परभणी येथील नूतन महिला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून तब्बल 33 वर्षे कार्य केले. सेवानिवृत्तीनंतर राज्य शासनाने मराठी शब्दकोश प्रकल्पाच्या प्रमुख संपादकपदी त्यांची नियुक्ती केली. 10 वर्षांपासून ठप्प असलेल्या शब्दकोशाच्या या कामाला प्राचार्य डांगे यांनी गती देऊन कोशाचे सात खंड पूर्ण केले. मूलपाठ दीपिका ज्ञानदेवी या ग्रंथाची त्यांनी दोन खंडांत सिद्धता केली.

मराठीतील प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी तयार करण्याचे काम प्राचार्य डांगे यांनी केले. राज्य शासनाने त्यांना मागील वर्षीच ज्ञानोबा तुकाराम हा प्रतिष्ठेचा पाच लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान केला होता. 2010 मध्ये प्राचार्य डांगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच संत साहित्यातील योगदानाबद्दल परभणीकरांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता.
(फोटो - प्राचार्य रामदास डांगे)