आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pradeep Jaiswal Trying To Rejoin Old Shivsena Supporters In Aurangabad

जैस्वालांकडे सूत्रे जाताच शिवसेनेत मोठे इनकमिंग, जुन्या सैनिकांना स्वगृही आणण्याची नवी मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील शिवसैनिकांनी सेना दूर केली ती केवळ उपनेते चंद्रकांत खैरे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून, असे अनेक जण जाहीरपणे सांगतात. यातील बहुतांश कार्यकर्ते हे ‘जय महाराष्ट्र’ म्हणता यावे म्हणून मनसेत स्थिरावण्याच्या प्रयत्नात होते. मात्र मनसेचे पानिपत अन् त्याचबरोबर खैरे यांना सेनेच्या स्थानिक निर्णयप्रक्रियेतून दूर केल्यामुळे यातील अनेकांनी पुन्हा शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला. महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली तसे प्रयत्न सुरू झाले आहेत.

येत्या २५ नोव्हेंबरला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शहरात असून त्यांच्या उपस्थितीत अनेक मनसैनिक शिवसेनेत दाखल होणार असल्याचे सूत्रांनी म्हटले. त्याचबरोबर शहरातील मनसेचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचाही निर्धार सेनेने केला आहे. भाजपमध्ये गेलेल्या काहींनाही पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. अन्य पक्षांतील मोठे कार्यकर्तेही संपर्कात असल्याचे समजते.

शिवसेनेची शहरातील जबाबदारी जैस्वाल यांच्याकडे दिली जाताच अनेकांनी पुन्हा सेनेत परत येण्यासाठी जैस्वाल यांच्याशी संपर्क साधला. गेल्या दोन दिवसांपासून अनेक माजी शिवसैनिक जैस्वाल तसेच अन्य तीन शहरप्रमुखांच्या संपर्कात आहेत.

जैस्वाल यांनाही या कार्यकर्त्यांच्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे त्यांनी मनसेतील अशा सर्वांनाच परत पक्षात घेण्याचे सूतोवाच केले. शहरातील मनसेचा मोठा गट येत्या २५ नोव्हेंबरला शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. जैस्वाल यांनी आधी मनसेतील कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचे ठरवले असून अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा विचार नंतर होणार असल्याचे म्हटले आहे.

पालिका निवडणुकीत भाजपला शह देण्याचे नियोजन : आगामी पालिका निवडणुकीत युती होणार नाही हे जवळपास नक्की आहे. तेव्हा स्वबळावर येथील सत्ता मिळवता यावी यासाठी सेनेचे प्रयत्न सुरू झाले असून त्यामुळेच पूर्वी घरातून निघून गेलेल्यांना सन्मानाने घरात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

तनवाणींना नो एंट्री
पक्षाबाहेर गेल्यानंतर पक्षाचे नुकसान ज्यांनी केले नाही, अशांनाच सन्मानाने पक्षात येता येईल, असे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी म्हटले आहे. त्यांचा रोख माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्याकडे आहे.

फायदाच फायदा
मनसेचा शहरात राजगौरव वानखेडे यांच्या रूपाने एकच नगरसेवक पालिकेत आहेत. असे असले तरी गेल्या निवडणुकीत मनसे उमेदवारांमुळे शिवसेनेचे किमान १२ नगरसेवक पराभूत झाल्याचे सांगण्यात येते. या वेळी तो फटका बसणार नाही. शिवाय मनसेला भवितव्य नसल्यामुळे काही दिवस शांत बसून पुढचे राजकारण करता येईल, असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

त्याच दिवशी राज शहरात
दरम्यान, मनसैनिकांना सेनेत प्रवेश देण्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शहरात आहेत. त्यामुळे ते शहरात दाखल होण्यापूर्वीच मनसैनिक सेनेत दाखल होतील, अशी शक्यता आहे.

पदाचा निर्णय आता नाही
^ अनेक जण पुन्हा पक्षात यायचे म्हणतात. त्यातील काहींना २५ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच सन्मानाने परत घेण्याचा विचार आहे. मात्र, नेमके कोण पक्षात येताहेत हे आताच सांगता येणार नाही. पुन्हा पक्षात आलेल्यांना पद द्यायचा निर्णय नंतर होईल. प्रदीप जैस्वाल,
माजी आमदार तथा महानगरप्रमुख.