आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राधिकरण निवडणूक : 29 जागांसाठी 61 उमेदवार रिंगणात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद महानगर विकास प्राधिकरणावर पाठवावयाच्या 29 सदस्यांच्या निवडीची गुंतागुंत कमालीची वाढली आहे. जेवढे उमेदवार तेवढी मते, असा नियम असल्याने ही निवडणूक टाळली जाईल अशी अपेक्षा होती; परंतु जास्तीचे उमेदवार मैदानात उतरल्याने 15 जुलैला यासाठी मतदान होणार आहे. शहरी भागातील 19 जागांसाठी 26, तर ग्रामीण भागातील 10 जागांसाठी 35 उमेदवार मैदानात आहेत.

शहराचे नियोजन याच प्राधिकरणाच्या हाती असल्याने यावर प्रतिनिधी म्हणून जाण्याची अनेकांची इच्छा होती. त्यामुळे माघार घेण्यास बहुतांश सदस्यांनी नकार दिला. खुलताबादमधून अनीस अब्दुल कादर यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ते बिनविरोध ठरले, तर उर्वरित 29 जागांसाठी येत्या 15 जुलैला मतदान होणार हे स्पष्ट झाले. निवडून आलेले 30 आणि शासनाने नियुक्त केलेले 15 शासकीय सदस्य मिळून हे प्राधिकरण अस्तित्वात येईल. त्यानंतर शासनाकडून अध्यक्ष नियुक्त केला जाईल. या प्राधिकरणासाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने मतदान कसे करायचे याची माहिती मतदारांना करून देण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे.

काय असतील अधिकार?
या प्राधिकरणाचे अधिकार शासनाने स्पष्ट केलेले नसले तरी शहराचा वाढता व्याप लक्षात घेऊन संभाव्य शहराचे नियोजन करणे, रस्ते कोठे व कसे असतील याचा निर्णय घेऊन आतापासूनच आरक्षण टाकणे, मैदाने तसेच मोकळ्या जागांवर आरक्षणाचे अधिकारही या प्राधिकरणाकडे जाण्याची शक्यता आहे.

रस्त्यांसाठी आरक्षण टाकण्याबरोबरच त्याची कामे करण्याचे अधिकारही या प्राधिकरणाकडे जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे पालिकेच्या अधिकारांवर गदा येऊ शकते. तसे होऊ नये म्हणून आतापासूनच काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली आहे.