आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमहापौरपद: निष्ठावंत चित्तेंना डावलून राठोड यांना दिली उमेदवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: तनवाणी आणि जगदिश सिद्ध यांनीही चित्ते यांची समजूत घालून त्यांना अर्ज भरण्यापासून परावृत्त केले.
औरंगाबाद - निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या नितीन चित्ते यांना ऐनवेळी माघारी बोलावून मूळ काँग्रेसवासी प्रमोद राठोड यांच्या गळ्यात उपमहापौरपदाच्या उमेदवारीची माळ टाकण्यात आली. अर्ज दाखल करण्यासाठी नगरसचिवांच्या दालनापर्यंत पोहोचलेल्या चित्ते यांना परत बोलावण्यात आले. शनिवारी (२५ एप्रिल) सायंकाळी घडलेल्या या प्रकाराने भाजपच्या निष्ठावंत गोटात कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. कोणत्या निकषावर राठोड यांना उमेदवारी बहाल करण्यात आली असा त्यांचा सवाल होता. मात्र, मनपा निवडणुकीची सूत्रे हलवणारे आमदार अतुल सावे वगळता अन्य कोणीही या निर्णयावर बोलण्यास नकार दिला. राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात, काही कमिटमेंट पाळाव्या लागतात. त्यामुळे श्रेष्ठींनी हा निर्णय घेतला असावा, असे ते म्हणाले.
पुढील पाच वर्षात महापौर, उपमहापौरासह अन्य पदांच्या कार्यकाळाची वाटणी ठरविण्यावर युतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. भाजपने हिरवा कंदील दाखवल्यावर शिवसेनेने महापौरपदासाठी त्र्यंबक तुपे यांची उमेदवारी जाहीर केली. त्याला तीन तास पूर्ण होण्यापूर्वीच भाजपने राजू शिंदे यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. मित्रपक्षाला असा धक्का देताना भाजपच्या नेत्यांनी निष्ठावंतांनाही हादरा दिला. काल सिडकोचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक नितीन चित्ते यांना उपमहापौरपद देण्याचे ठरले होते. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ते महापालिका मुख्यालयात पोहोचले. त्यांच्या अर्जावर अपक्ष राजू तनवाणी यांनी सही केली. तेथून ते दुसऱ्या मजल्यावरली नगरसचिवांच्या दालनात पोहोचले. तेवढ्यात त्यांना शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांनी खुणावून खाली या, असे सांिगतले. निष्ठावंत असल्याने ते खाली आले. मग आमदार सावेंनी त्यांना तुमचा पत्ता कट झाला असून राठोड उमेदवार असल्याचे सांगितले. ते ऐकून चित्ते यांना जबर धक्का बसला, तरीही सावेंच्या विनंतीला मान देऊन ते त्यांच्याच चारचाकीतून मुख्यालयातून बाहेर पडले.

राठोडांविषयी नाराजीचे कारण
मोदींची लाट पाहून राठोड पक्षात आले. त्यांना विश्रांतीनगरातून उमेदवारी देण्यात आली. पक्षात ते नवखे आहेत. तीन वेळा निवडून आलेले अनेक नगरसेवक पक्षात आहे. शिवाय अनेक वर्षे कार्यकर्ता म्हणून काम केलेले नवीन चेहरेही निवडून आले आहेत. त्यामुळे निष्ठावानांना उमेदवारी मिळावी अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र राठोड यांचे नाव समोर आल्याने नाराजी समोर येत आहे.

निष्ठेला काय किंमत?
राठोड यांचे नाव पुढे केल्याचे समजताच शहराध्यक्षांसह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अलीकडच्या काळात पक्षात फक्त सेटलमेंटच चालत असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना केला. भाजपमध्ये आता निष्ठेला काहीही स्थान राहिलेले नाही. फक्त आर्थिक कुवत बघितली जाते, ज्याच्याकडे पैसे आहेत, अशांनीच या पक्षात राहावे, असा आरोप केला आहे. अधिकृतपणे बोलण्यास या मंडळींनी नकार दिला असला तरी येत्या काळात श्रेष्ठींच्या या निर्णयाचे पडसाद उमटत राहतील, असा त्यांचा सूर होता.

भाजपत ‘रावसाहेबगिरी’ सुरू झाल्याचा काही नेत्यांचा खासगीत आरोप

रिंगणात असलेले उमेदवार
महापौर : त्र्यंबक तुपे, राजू शिंदे, गंगाधर ढगे व अफसर खान
उपमहापौर : प्रमोद राठोड, नासेर सिद्दिकी, खान फेरोज व कैलास गायकवाड.

रोख दावनेंवर
राठोड यांना उपमहापौरपदाची उमेदवारी देण्याबरोबरच महापौरपद सेनेला सोडण्याचा एकतर्फी निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच घेतला असून ही कृती म्हणजे सेनेला सर्व काही बहाल करण्यासारखे असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दानवे यांनी हट्टानुसार काम करण्यास प्रारंभ केला असून भाजप त्यांना संपवायची आहे, अशाही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

राठोड भाजपचेच
राठोड यांना उपमहापौरपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. ते पक्षात नवे असले तरी कमळावरच निवडून आले आहेत. पक्षाला काही गोष्टीत तडतोड करावी लागते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असावा. आम्ही महापौरपदासाठी राजू शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. महापौर कोणाचा हे एक-दोन दिवसांत ठरेल. सध्या वरिष्ठांच्या निर्णयाची अंमलबजावणी हेच माझे काम आहे.
अतुल सावे, आमदार.